मुंबई प्रतिनिधी :
दि. 04 जुलै 2022 ‘विक्रम वेधा’ च्या निर्मात्यांनी हृतिक रोशनच्या उत्तर प्रदेशातील शूटिंगला नकार देण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
जून 2022 मध्ये विक्रम वेधाचे दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री तसेच प्रमुख कलाकार हृतिक रोशन आणि सैफ आली खान व राधिका आपटे यांनी चित्रपटाचे शूटिंग आटोपले. हा चित्रपट आर. माधवन आणि विजय सेतुपती यांनी केलेल्या ओरिजिनल विक्रम वेधाचा हिंदी रिमेक आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट अतिशय प्रसिद्ध अश्या ‘विक्रम वेताळ’ या गोष्टीवर आधारित आहे. आता निर्मात्यांनी हृतिक रोशनच्या नकाराबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्याने उत्तर परदेशात शूटिंग करण्यास नकार दिल्याच्या बातमीबद्दल हे स्पष्टीकरण दिले आहे. ही नकाराची बातमी पुढे असंही कारण सांगते की हृतिकला उत्तर प्रदेश ऐवजी दुबईत शूट करावं असं वाटतंय आणि चित्रपटाचं बजेट त्यामुळे कल्पनेपलीकडे वाढतंय.
निर्माते म्हणतात, “आमच्या निदर्शनास आलंय की ‘विक्रम वेधा’च्या लोकेशन्सबाबत बरेच चुकीचे रिपोर्ट्स प्रसारित होत आहेत. हे रिपोर्ट्स दिशाभूल करणारे तसेच तथ्यहीन आहेत. आम्ही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की विक्रम वेधाचं शूटिंग संपूर्ण भारतभर कुठल्याही अडथळयाविना पार पडलंय. यात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचाही महत्त्वाचा वाटा आहे. शिवाय या सिनेमाचा बराचसा भाग युनायटेड अरब एमिराट्स मध्ये शूट झाला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 मध्ये हे शूटिंग झालं होतं.”
पुढे त्यांनी हेही स्पष्ट केलं की हृतिक रोशनने उत्तर प्रदेशमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला नकार दिला ही निव्वळ अफवा आहे. काही खोडकर लोकांचे हे चाळे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.