मुंबई प्रतिनिधी :
दि. 04 जुलै 2022
टेलिव्हिजन आणि बॉलीवूड मध्ये आपल्या चरित्र आणि विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उपासना सिंघ लवकरच ‘मासूम’ नावाच्या वेब सिरीजमध्ये चाहत्यांना दिसणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कलाकार बोमन इराणी तर आहेच पण दीपक तिजोरीची कन्या समारा तिजोरी पण या वेबसिरीजद्वारे पदार्पण करते आहे. याच ‘मासूम’च्या प्रमोशन दरम्यान उपासना सिंघने तिचा कपिल शर्माबरोबरचा कार्यकाळ, तिचे कॉमेडीयन आणि अँकर कपिल शर्माबरोबरचे रिलेशन आणि ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्याचे कारण यांबद्दल एका वाहिनीला मुलाखत देताना विस्तृतपणे संगितले.
मुलखातीदरम्यान उपासना सिंघने स्पष्टपणे विविध गोष्टींचा खुलासा केला. उपासना सिंघ शोमध्ये कायम दिसत असे आणि तिचं विनोदाचं टाईमिंगही अफलातून आहे हेही प्रेक्षक जाणतात. तरीही एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला पेमेंट चांगलं मिळत असतानाही शो सोडण्याचं कारण तिनं सांगितलं. ती म्हणाली, “जेव्हा 2 ते 2.5 वर्षं मी कपिल शर्मा शो करत होते तेव्हा आमच्या शोने टेलिव्हिजनवर नं. 1 ची जागा पटकावली होती. पण कालांतराने मला असं जाणवायला लागलं की मला काही नवीन केल्याचा फील येत नाहीये. जरी मला चांगलं पेमेंट मिळत असलं तरी मी काही नवीन स्टेजवर सादर करतीये असं मला वाटत नव्हतं. मी याबाबत कपिलशी बोलले. मी त्याला हेही सांगितलं की जेव्हा आपण हा शो सुरू केला तेव्हा खूपच मजा येत होती. पण जसा काळ जात गेला, मला तेच ते करत असल्यासारखं वाटायला लागलंय. काहीच ‘जॉब सॅटिसफॅक्शन’ मिळत नाहीये. सारं नाविन्यच संपलंय असं वाटतंय!”.
या ओघातच ती पुढं म्हणाली की तिचं आजही कपिल शर्माशी चांगलं जमतं. आजही त्यांचे चांगले संबंध आहेत. ती पुढे म्हणते “आजही आम्ही चांगले मित्र आहोत. मी त्याला हेही सांगितलंय की शोमध्ये जर काही नावीन्य आलं तर मी नक्की परत येईन. माझ्याकडे रोल घेऊन येणार्या प्रत्येक निर्मात्याला मी हे सांगत असते”.