मुंबई प्रतिनिधी :
दि. 06 जुलै 2022
महाराष्ट्रात फार मोठी राजकीय उलथापालथ नुकतीच झाल्याचे आपण सर्वांनी अनुभवले. मा. उद्धव ठाकरे सरकार पडले आणि मा. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नवे कोरे सरकार स्थापन केले.
या घडामोडींमागचे सूत्रधार, कर्ते करविते कोण याचे बरेच आडाखे बांधले गेले. यातली बरीच माहिती हळूहळू उजेडात येते आहे. पण यापुढेही जाऊन आता एक वेगळाच प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
तसं पाहता विधानसभेचे अध्यक्ष म्हणून मा. राहूल नार्वेकर निवडून आले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही निवड झाली. नव्या सरकारनं विश्वासदर्शक ठरावही जिंकला. मग आता राहिलं काय? अहो हे राहिलेलं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ती गोष्ट म्हणजे आता शिवसेनेचा सर्वोच्च अधिकारी म्हणून कोणाला मान्यता मिळणार?
यात मा. राज ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. मा. राज ठाकरे यांनी नुकतीच मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध जोरदार मोहीम छेडली होती. हनुमान चालीसा विरुद्ध भोंगे असं जोरदार स्वरूप या मोहिमेला प्राप्त झालं होतं. या निमित्ताने राज ठाकरे यांचा कणखर बाणा, हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरची त्यांची पकड आणि त्यांच्यात दिसणारी बाळासाहेबांची छबी हे सारं जनतेच्या नजरेसमोर पुन्हा एकदा आलं.
आता सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेच्या दोन्ही गटातील म्हणजे मा. उद्धवजींच्या गटात असणारे आणि बंडखोर शिंदे गटात असलेले दोन्हीकडचे शिवसैनिक या गोष्टीला अनुकूल असल्याची माहिती मिळते आहे. मा. राज ठाकरे यांचा आवाज, त्यांची बोलण्याची शैली आणि त्यांचा कणखर आणि करारी बाणा हे सर्व बाळासाहेबांची आठवण करून देतात असाही एक सूर उमटत आहे.