मुंबई प्रतिनिधी :
दि. 06 जुलै 2022
महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. मा. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कारभारही सुरू केला आहे. 4 जुलैला फ्लोर टेस्टमध्ये बहुमतही सिद्ध केलंय. आता वेळ होती त्यांच्या सडेतोड बोलण्याची. यावेळी मा. एकनाथ शिंदे यांनी आपली सगळी घुसमट बाहेर काढत गेल्या अडीच वर्षांचा शिवसेनेच्या उफराटया कारभाराचा जणू पाढाच वाचला. हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेबांच्या तत्त्वांची होत असलेली पायमल्ली तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मिंधेगिरी शिवसेनेच्या अस्तित्त्वाला नामशेष करू पाहात होत्या असाच त्यांच्या बोलण्याचा सूर होता असे सूत्रांकडून समजते.
“शिवसैनिक हिंदुत्त्वासाठी आवाज उठवू शकत नव्हते. एवढंच नव्हे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या झालेल्या अपमानाबद्दल जाब विचारण्याचीसुद्धा मनाई होती. कारण शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकारमध्ये होती” असंही ते म्हणाल्याचं समजतं. पुढे ते म्हणाले “वीर सावरकरांचा गेल्या वर्षभरात राहुल गांधी यांनी वेळोवेळी अपमान केला पण आम्हाला जाब विचारण्याची अथवा त्याविरुद्ध आवाज उठवण्याची मनाई केली गेली होती. आम्ही शिवसैनिकांनी गेल्या अडीच वर्षांत खूप काही सहन केलं आहे.”
गेल्या अडीच वर्षांत आपल्या तत्त्वांना पायदळी तुडवायला लावल्याबद्दल मा. एकनाथ शिंदेंनी मा. उद्धव ठाकरे यांना बरंच सुनावल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ते पुढे म्हणाले की शिवसैनिकांना गप्प राहाण्यासाठी विवश केलं गेलं. याशिवाय दाऊदसारख्याशी संबंध ठेवणार्यांवर कारवाई करण्यापासून थांबवण्यात आलं. ज्या शिवसेना नेत्यांनी बंड केलं ते शिवसैनिकच होते…मा. बाळासाहेबांच्या आदर्शांना आजही शिरसावंद्य मानणारे शिवसैनिक!
पुढे ते म्हणतात, “आम्हाला सत्तेची लालसा कधीच नव्हती. आम्ही मा. बाळासाहेब आणि मा. आनंद दिघेंचे कट्टर अनुयायी आहोत, ज्यांनी कायम जनतेच्या हिताचाच विचार केला. आम्ही त्यांच्या विचारांविरुद्ध कधीच बंड करू शकत नाही!”