मुंबई प्रतिनिधी :
दि. 06 जुलै 2022
महाराष्ट्रात सत्ताबदल एकदाचा झाला. प्रचंड नाट्य गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रानं आणि देशानंही अनुभवलं. पण आता उत्सुकता अशी लागून राहिली आहे की या कथेचे लेखक, दिग्दर्शक कोण होते? मुख्य कलाकार कोण होते? आणि याचं शूटिंग एवढ्या गुप्तपणे कसं झालं?
महाराष्ट्रात आता सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचीही बांधणी होणार आहे. पण आता या सगळ्या चित्रपटात खरा हीरो आणि कर्ता करविता कोण आहे हे समोर आलं आहे. शिवाय हा खळबळजनक चित्रपट तयार कसा झाला हेही समजलं आहे.
भारतीय राजकारणात एकच सुपरस्टार आहे हे आपण सर्वजण जाणतो, ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी! असा खेळ झाला की डाव्या हाताची खबर उजव्या हाताला लागली नाही. हे सगळं सुरू झालं 6 महिन्यांपूर्वी आणि आता जेव्हा सूरत-गुवाहाटी नाट्य रंगलं होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रोज बोलणं होत होतं असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय…आणि हे बोलणं फोनवर होत नव्हतं बरं का, तर त्यांची प्रत्यक्ष भेट होत होती.
सूत्रं पुढे सांगतात की जेव्हा बंडखोर आमदार सूरतहून गुवाहाटीला पोहोचले तेव्हा रात्रीच्या अंधारातलं नाट्य रंगायला सुरुवात झाली. एक चार्टर्ड प्लेन फडणविसांना घेऊन मुंबईहून निघायचं आणि सूरतला जायचं. देवेंद्र फडणवीस वेषांतर करून निघत होते. गॉगल, हूडी असा सगळा जामानिमा होता. खुद्द त्यांच्या पत्नीही त्यांना ओळखू शकत नव्हत्या. तिकडे गुवाहाटीलाही सगळी निजानीज झाल्यावर एकनाथ शिंदे निघायचे. एवढंच नाही तर दोनदा तर दिल्लीहूनही प्लेन निघालं होतं. त्यात होते गृहमंत्री अमित शाह. हे जे सगळं घडत होतं ते फडणवीस आणि मा. एकनाथ शिंदे पूर्णत्त्वाला नेत होते आणि आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देत होते.
आश्चर्याची गोष्ट अशी की सगळ्या सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे पोलिस, सीआयडी इ. ताब्यात असतानासुद्धा कुणाला कानोकान खबर लागली नाही हे विशेष. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या त्या राज्याच्या गुप्त यंत्रणा रोज सकाळी माहिती देत असतात. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दिवस सुरू होतो. पण तिकडेही सगळं आलबेल दिसत होतं. कमीत कमी देवेंद्र फडणवीस कुठे जातायत येतायत याचीही खबर त्यांच्याकडे नव्हती. ते रोज मुंबई-सूरत-मुंबई करत होते आणि यांना पत्ताच नव्हता. आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात एक चार्टर्ड प्लेन गुवाहाटीवरून निघून सूरतला जात होतं याचाही पत्ता कुणाला लागला नाही. ही भेट सूरतला व्हायचं नक्की झाल्याने बाकी सगळे सूरतहून गुवाहाटीला शिफ्ट झाले असंही समजतं.
आणि…मग दिल्लीहून आला एक फोन कॉल! ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला. फोन होता पंतप्रधान मोदींचा. केला होता एकनाथ शिंदेंना. म्हणाले “तुम्ही होताय मुख्यमंत्री!” एकनाथ शिंदेंना हा आश्चर्याचा फार मोठा धक्का होता. त्यांच्या घरच्यांनादेखील याची कल्पना नव्हती. ते उपमुख्यमंत्री बनणार असंच सगळ्यांना माहीत होतं. मा. मोदींचा फोन झाल्यावर पाच मिनिटात आला अमित शहांचा फोन…अभिनंदांनासाठी…आणि एका सुपर डुपर चित्रपटाच्या रिलीजची तयारी कुणालाही खबर न लागता पूर्ण झाली!