हिंगोली प्रतिनिधी :
दि. 11 जुलै 2022
ऐन विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी बंडखोरी करत कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटाला मतदान केले होते. बांगर यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णायामुळे शिवसेननेला धक्का बसला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोरांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेत त्यांच्याकडे असलेली पदे काढून घेण्याचा धडाका लावला आहे.
आमदार बांगर हे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. ते शिंदे गटासोबत गेल्यामुळे ठाकरे यांनी त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली. या कारवाईनंतरही बांगर यांनी मीच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असून मला या पदावरून कोणीही हटवू शकत नाही अशी घोषणा केली होती.
एवढ्यावरच न थांबता आता बांगर आपल्या हजारो समर्थकांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. समर्थकांना घेऊन शक्तीप्रदर्शन करत हे सगळे लोक शिंदे गटात सामील होणार आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
बांगर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तुम्हीच जिल्हाप्रमुख आहात, असे सांगत त्यांना हिंमत दिली तरीही समर्थकांचा संताप काही केल्या कमी होत नाहीये. त्यामुळे ते उद्या, जिल्ह्यातील एक हजारावर समर्थकांसह मुंबईला जाणार आहेत.
तिथे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर ते या सगळ्या समर्थकांचा शिंदे गटात समावेश करून घेणार आहेत. मुंबईला जाण्यासाठी खाजगी वाहनांची व्यवस्था केली असून मोठ्या संख्येने समर्थक शिवसैनिक मुंबईला येणार आहेत.