मुंबई प्रतिनिधी :
दि. 12 जुलै 2022
मुंबई : शिवसेनेत नुकतीच चाळीस आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे अवघ्या देशाने अनुभवले. आता आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अश्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना आणखीच जोर चढला आहे असे सूत्रांकडून समजते.
जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी थेट अग्रदूत बंगल्यावर पोहचले. मात्र आव्हाड यांनी ही भेट कशासाठी घेतली याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व नेते हजर होते. ही बैठक सुरू असताना जितेंद्र आव्हाड मात्र एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले असे विश्वसनीय सूत्रांनी संगितले. आता या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची भेट झाली नव्हती. माझ्या मतदार संघात एक बायपास असा आहे की ज्याच्या सळया बाहेर आल्या आहेत आणि कधीही अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब मी त्यांच्या कानावर घालण्यासाठी गेलो होतो आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी मी त्यांना केली. अर्थात विकासकामांच्या मुद्द्यावर मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. मी त्यांना सविस्तर भेटीची वेळ मागितली आहे,पण ती कधी मिळेल याची कल्पना नाही.