पुणे प्रतिनिधि :
दि. 13 जुलै 2022
पुण्यातल्या खेळीमेळीच्या राजकारणाचे उदाहरण नेहमीच सांगितले जाते. राजकीय विरोध हा फक्त राजकारणपुरताच असावा या संकेतानुसार पुण्यातली सर्वपक्षीय मंडळी सातत्याने एकत्र येत असतात. यंदा या परंपरेला चमचमीतपणा आणि खमंगपणा यांची जोड मिळाली आहे. पुण्यातली राजकीय मंडळी चक्क सर्वपक्षीय आखाड सोहळा साजरा करत आहेत. आषाढ सुरु झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांसह अन्य पक्षीय नेते-कार्यकर्ते मटणाच्या नळ्या फोडण्यासाठी, रस्सा ओरपण्यासाठी दररोज एका पंगतीला बसतात असे सूत्रांकडून समजते आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचे सरकार स्थापन झाले. राजकीय घडामोडींचा या सर्वपक्षीय आखाड सोहळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. या सोहळ्याला पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट हे देखील उपस्थित असतात असे समजते. मात्र ते मांसाहार करत नसल्यामुळे त्यांच्या पुरती शाकाहारी जेवणाची सोय केली जाते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यंदाच्या आखाडात एकही खाडा होऊ नये यासाठी भन्नाट कल्पना लढवली आहे. व्रतवैकल्यांनी भरलेल्या श्रावण मासात अनेक हिंदू धर्मीय मांसाहार करत नसल्याने त्याची भरपाई त्या आधीच्या आषाढ महिन्यात केली जाते. यातूनच आषाढ मास उत्सवाच्या कल्पनेने जन्म घेतला. जुलैच्या एक तारखेला सुरु झालेला हा उत्सव येत्या २८ जुलैपर्यंत साजरा होणार आहे. मात्र होऊन गेलेली आषाढी एकादशी आणि आजची गुरुपौर्णिमा या दिवशी या सोहळ्याला सुट्टी असेल.
बाकी सर्व दिवशी मनसोक्त मांसाहाराच्या पंगती उठवल्या जात आहेत. या उत्सवादरम्यान कार्यकर्त्यांनी दिवस वाटून घेतले आहेत. संबंधित नेता-कार्यकर्ता त्याच्या ठरलेल्या दिवशी कोंबडी, बोकड, मेंढा, मासे यांच्या मांसाचे जमतील तितके पदार्थ लोकांना पंगत बसवून खाऊ घालतो. भाकरी, चपाती, भात, बिर्याणी यांच्या संगतीने या पंगतीत रोज किलोवारी मांसाचा फन्ना उडतो आहे. लखनवी, हैद्राबादी, कोल्हापुरी, मालवणी, सावजी अशा विविध चवींच्या अनेक ‘मांसाहाराची’ रेलचेल या पंगतीत असते. त्या त्या कार्यकर्त्याचा उत्साह आणि खर्च करण्याची इच्छा यावर पंगतीतल्या पदार्थांची संख्या कमीजास्त होत राहाते. अट मात्र एकच असते ती म्हणजे दररोज मांसाहार असलाच पाहिजे.
या अभिनव सर्वपक्षीय आखाडाची पुण्यात चविष्ट चर्चा आहे. सूत्रांकडून असेही समजते की हा आखाड सोहळा ज्या अंकुश काकडे यांच्या संकल्पनेतून सकारतोय ते म्हणतात आखाडात मांसाहार करणे सर्वांनाच आवडते. मात्र, रोज कोणाला तरी पार्टी मागत बसणे किचकट असते. रितसर नियोजन केल्यास हे सहज आणि सोपे होईल असे वाटले आणि त्यातून या सर्वपक्षीय आखाड महोत्सवाची कल्पना पुढे आली. राजकारणातला विरोध, मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळे एका पंगतीत बसून मांसाहाराचा आनंद लुटतो. यातून एकोप्याची, सामंजस्याची भावना टिकून राहाते.