मुंबई प्रतिनिधी :
दि. 19 जुलै 2022
नुकत्याच सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार शिवसेनेचे 14 मंत्री एकनाथ शिंदे यांना सामील झाले आहेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे निकटचे मानले जाणारे रामदास कदम यांनीही राजीनामा देऊन शिवसेनेला रामराम ठोकला आहे. यापुढचा धक्का आणखी जोराचा तेव्हा बसला जेव्हा रामदास कदम यांनी मीडियासमोर उद्धव ठाकरे यांच्या कारनाम्यांचा पाढा वाचला.
रामदास कदम म्हणाले पार्टीत असताना त्यांचा कायम अपमान केला गेला. मीडियासमोर बोलण्यापासून थांबवलं गेलं. उद्धव यांच्या शिवसेनेने त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलालाही अपमानित केलं. याचाच परिणाम म्हणून रामदास कदम आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र योगेश कदम यांनीही एकनाथ शिंदे गटाला जवळ केलं. ज्यामुळे उद्धव ठाकरे पेचात सापडले आहेत आणि शिवसेनाही त्यांच्या हातून निसटताना दिसायला लागली आहे. नेत्यांच्या या निघून जाण्याने उद्धव ठाकरे यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे. ही वेळ त्यांच्यावर एकावेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रपंच केल्याने ओढवली आहे असे बोलले जात आहे. एकीकडे त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन दिले आहे आणि दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदासाठी ते विरोधी पक्षांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या दुटप्पी भूमिकेमुळेच ते अडचणीत आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या मंत्र्यांनी त्यांना आधीच सूचना दिली होती की जर ते राष्ट्रपती वा उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचं समर्थन करतील तर ते आपले मंत्री गमावतील.
शेवटी हे मंत्री एकनाथ शिंदे यांना सामील झाले. याद्वारे अमित शहांचा प्लॅन यशस्वी झाल्याचंही बोललं जात आहे. कारण द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचं समर्थनही मिळालं आणि 14 मंत्रीही उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब गेले.