पंजाब प्रतिनिधी :
20 जुलै 2022 (4:15 PM)
सिद्धू मूसेवालाच्या मारेकर्यांबरोबर पंजाब पोलिसांचा गोळीबार या क्षणी सुरू आहे. पाकिस्तान बॉर्डरपासून आत 9 किमीवर एका हवेलीत त्यांनी आश्रय घेतलाय आणि तिथून ते पोलिसांवर एकसारखा गोळीबार करत आहेत. यात चार पोलीसही जखमी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दोन मारेकरी जखमी झाले आहेत आणि सिद्धूचा मारेकरी जगरूप रूपा व आणखी एक जण या गोळीबारात मारला गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. या मारेकर्यांचा पाकिस्तानात पळून जाण्याचा इरादा होता पण त्याआधीच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. ते पकडले जाणार हे लक्षात येताच ते आता या हवेलीत घुसले आहेत. हेच त्यांचं लपण्याचं ठिकाण होतं असंही समजतंय. तब्बल सात मारेकर्यांना पोलिसांनी या क्षणी घेरलं आहे. ही संख्या जास्तही असू शकण्याचा अंदाज आहे. हे एनकाऊंटर अटारी बॉर्डरवर सुरू आहे. आता हे मारेकरी आहेत की अतिरेकी आहेत हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन किमीच्या बॉर्डरमध्ये पोलिसांनी त्यांना घेरलं असल्याने त्यांचं पलायन अशक्य असल्याचा अंदाज आहे.
पाकिस्तानातून त्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण सध्याही ते पोलिसांवर सतत करत असलेल्या गोळीबारावरून त्यांच्याकडे बराच साठा असण्याचा संशय आहे. पण हे मारेकरी आता पोलिसांच्या सापळ्यात अडकत चालल्याचा सूत्रांचा दावा आहे. गेल्या चार तासांहूनही अधिक काळ हे फायरिंग चालू आहे. काल रात्री पोलिसांना ही खबर मिळाली होती की हे मारेकरी या ‘पुरानी हवेली’ भागात लपले आहेत. पोलिसांना आता SOG टीमही सामील झाली आहे.