मुंबई प्रतिनिधी :
दि. 28 सप्टेंबर 2022 :
राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’ (NIA – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) ने देशभरात पीएफआय (PFI) संघटनेच्या ठिकाणांवर छापे टाकून जवळजवळ 300 जणांना अटक केली होती. त्यानंतर लगेचच बुधवारी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. NIA ने आता पीएफआयच्या विरोधात सक्त पावले उचलली आहेत.
NIA ने देशभरातील PFI ची सुमारे ३४ बँक खाती गोठवण्यास सुरवात केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. देश विघातक कृत्यात सहभागी असल्याच्या कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे.
पीएफआयच्या देशविघातक कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढून ही बंदी घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानत पीएफआय वरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबरोबरच मागील आठवड्यात पुण्यामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अश्या घोषणा देणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अनेक देश विघातक कृत्यात पीएफआय संघटना सामील असल्याचे पुरावे NIA च्या हाती लागले होते. मागील काळात देशात घडलेल्या काही धार्मिक दंगली, विशिष्ट घटना यांमध्येही पीएफआय संघटनेचा थेट सहभाग आढळून आला होता. CAA आंदोलनालाही PFI ची फूस होती अशी चर्चा आहे. या संघटनेवर भारतात पाच वर्षांसाठी बंदी घातली गेली आहे. सोबतच ‘पीएफआय’शी संबधित संघटनांवरही बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएफआय महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, आसाम, केरळ, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात सक्रिय होती. 15 राज्यांमध्ये सक्रिय असलेल्या या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानं पीएफआयची पाचावर धारण बसली आहे. एनआयएकडून पुढील तपास अधिक कसून केला जात आहे.