मुंबई प्रतिनिधी :
दि. 07 ओक्टोबर 2022
मुंबई : मॉडेल दिशा सलियन मृत्यू प्रकरणात, जी आत्महत्त्या दाखवली गेली होती, त्यात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचे बोलले जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केला. आता त्यांचे सरकार नाही. आमचे सरकार आहे. त्यामुळे आता चौकशी होणारच असा इशाराही राणे यांनी दिला.
या प्रकरणात यापूर्वी मी थेट नाव घेतले नव्हते. मात्र, आज थेट नाव घेत आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. खासगीत बरेचजण बोलत असून आता जर का या प्रकरणाची चौकशी केली तर सर्वकाही बाहेर येईल, असे राणे म्हणाले. मॉडेल दिशा सलियन प्रकरणात नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्याकडून गेल्या एक-दीड वर्षभरापासून अप्रत्यक्षपणे वारंवार आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात येत होते. मात्र, आज प्रथमच राणे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जाहीरपणे घेतले आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतेवेळी राणे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मला मारण्यासाठी छोटा शकील व राजन टोळीला उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती असा आणखी एक गंभीर आरोप राणे यांनी केला. याला मारायला लाव. त्याचे घर जाळ या पलिकडे उद्धव ठाकरे यांनी केले तरी काय? असा सवलाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंचे योगदान काय असा प्रश्न राणे यांनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही अशी घणाघाती टिप्पणी त्यांनी केली. ज्यांनी अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अडीच तासदेखील काम केले नाही, त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका करणे शोभते काय, असा खोचक प्रश्न राणे यांनी केला. या पुढच्या काळात अशी टीका आम्ही अजिबात सहन करणार नाही. ते असेच बोलत राहिले तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.