मुंबई प्रतिनिधी :
दि. 08 ऑक्टोबर 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारच जर उतरवणार नाही, तर ते निवडणूक चिन्ह का मागत आहेत, असा दावा शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगापुढे केला गेला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात याआधी आमचाच आमदार होता, त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्हाचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवावा, अशी मागणीही शिवसेनेने आयोगाकडे केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी कागदपत्रं सादर करण्यात येत आहेत. शिवसेनेकडून आज निवडणूक आयोगापुढे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भाने निवडणूक चिन्हाबाबत दावा केला गेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही तर मग त्यांची चिन्ह मागण्याची घई का चालली आहे? असा मुद्दा शिवसेनेकडून निवडणूक आयोगापुढे मांडण्यातआला आहे. निवडणूक चिन्हाबाबत निर्णय लगेच घ्यावा अशी आणीबाणीची स्थिती सध्या नाही. त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत तात्काळ सुनावणी घेण्यात येऊ नये, असे म्हणणे शिवसेनेकडून मांडण्यात आले आहे. तात्काळ सुनावणी घेऊ नये, यासाठी शिवसेनेकडून एकूण तीन कारणे निवडणूक आयोगासमोर मांडली गेली आहेत. त्यापैकी वरील एक कारण आहे.