नाशिक प्रतिनिधी :
दि. 20 ऑक्टोबर 2022
आगामी महापालिका तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांच्यामार्फत महापालिकेच्या विषयांसंदर्भात सलग दुसऱ्यांदा बैठक होत असल्याने भाजपच्या नेत्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. २१ ऑक्टोबरला मुख्यमंत्री नाशिकमध्ये येत आहेत आणि त्याच दिवशी पालकमंत्र्यांची बैठकही होते आहे हे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया भाजपमधून व्यक्त होत आहे.
वरिष्ठांपर्यंत सातत्याने तक्रारी करून गिरीश महाजन यांना पुन्हा पालकमंत्री करावे, यासाठी आग्रह धरला जात आहे. महाजन यांची पालकमंत्री पदी निवड होण्यामागे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती तसेच महापालिकेशी संबंधित अनेक सत्तेच्या पदांचा संदर्भ आहे. त्यामुळे भाजपमधील एका मोठ्या गटाला पालकमंत्री पदी गिरीश महाजन हवे आहेत असे बोलले जात आहे.
महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्री पदी बसण्याची इच्छादेखील लपून राहिलेली नाही. काही ना काही निमित्त करून महाजन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात येत असतात. दरम्यान, पालकमंत्री पदी दादा भुसे यांची नियुक्ती झाल्यानंतर अनेकांचा पोटशूळ उठला असेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते. असे असले तरी आलेल्या संधीचे सोने करत दादा भुसे यांनीदेखील बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अर्थात शिंदे गटाचा पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्यातील निवडक मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकचा क्रमांक येतो. त्यामुळे शिंदे गटाची सत्ता महापालिकेत आणण्यासाठी भुसे व खासदार हेमंत गोडसे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर भुसे यांनी महापालिका मुख्यालयात महापालिकेचे विषय संदर्भात बैठक घेत शासन दरबारी काही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर मात्र आता लगेचच २१ ऑक्टोबरला पालकमंत्री भुसे हे पुन्हा एकदा महापालिकेच्या विषयासंदर्भात बैठक घेणार असल्याने शिंदे गटाची नाशिक शहरात पाळेमुळे रुजविण्यासाठी योजना असल्याचे बोलले जात आहे.
२१ ऑक्टोबरला होणार्या या महापालिकेच्या बैठकीत पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण, सिडको व पंचवटी विभागात २०० खाटांचे नवीन रुग्णालय, शासनाकडे रखडलेला महापालिकेचा आकृतिबंध, सिडकोतील २८ हजार सदनिका फ्री होल्ड करणे, घरपट्टीच्या वाढीव दराचे पुनर्विलोकन, झोपडपट्टीमध्ये एसआरए स्कीम राबवणे, जुन्या वाड्यांच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या गोटात मात्र शंकाकुशंकांचे वादळ निर्माण झाल्याचे समजते.