जळगाव प्रतिनिधी :
दि. 11 नोव्हेंबर 2022
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील तणाव कायम आहे, यात आणखी भर म्हणून खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमधून भाजपनं आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाजप-खडसे वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी दाखल करून चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जाला खडसेंनी आक्षेप घेतला आहे. एकनाथ खडसे यांचे म्हणणे आहे की बाहेरच्या तालुक्यातील उमेदवार या प्रकारे अन्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करू शकत नाही,
आज (शुक्रवारी) अर्जांची छाननी होणार आहे. जिल्ह्याचे लक्ष, यात कोणाचे अर्ज बाद होतात, याकडे असणार आहे. चव्हाण यांच्या अर्जावर जोरदार हरकत घेणार असल्याची घोषणा आमदार खडसे यांनी गुरुवारीच केली होती. त्यांची हरकत नामंजूर झाली तर त्याविरुद्ध अपिल करण्याची तयारीही त्यांनी केलेली आहे.
मुक्ताईनगरमधील आमदार चव्हाण यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली जाण्याचे कारण म्हणजे, जरी उमेदवारी बाहेरच्या तालुक्यात करता येत असेल तरी त्याला सूचक आणि अनुमोदक मात्र त्याच तालुक्यातील असायला हवेत. अशीही तरतूद उपविधीत आहे, असे आमदार खडसे यांचे म्हणणे असल्याचे समजते. आमदार चव्हाण यांचे सूचक तसेच अनुमोदकही बाहेरच्या तालुक्यातील असल्याने उमेदवारी टिकणार नाही, असेही खडसे म्हणाले.