पुणे प्रतिनिधी :
दि. 13 डिसेंबर 2022
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मंगळवारी विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून ‘पुणे बंद’ची हाक दिली आहे. भाजपा, मनसे व शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट वगळता राज्यातील सर्व पक्षांचा या बंदला पाठिंबा मिळाला आहे. पुणे बंद ठेऊन पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.
यादरम्यान शहरात कोणत्याही स्वरुपाची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना, पक्षांकडून पुकारलेल्या या बंदमध्ये अनेक सामाजिक, स्वयंसेवी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. सकाळी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन जिजामाता चौक, लाल महाल येथे त्याची सांगता होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या पथकांचा बंदोबस्त या मोर्चाच्या वेळी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे या मोर्चावर पूर्ण लक्ष आहे. याबरोबरच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याचीही पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. मोर्चाच्या मार्गावर तसेच अनुचित प्रकार घडू शकेल अशा काही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
शिवसेनेकडून सुरवातीला राज्यव्यापी बंदची योजना करण्यात आली होती. मात्र, हा राज्यव्यापी बंद ठेवण्यास महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी सहमती न दर्शवल्याने. दुसरा मार्ग म्हणून आघाडीच्यावतीने 17 डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोर्चाची महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे.कोश्यारी यांचे वक्तव्य तसेच राज्य सरकारच्या एकूणच कारभाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे.