मुंबई प्रतिनिधी :
दि. 27 डिसेंबर 2022
दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याने आत्महत्त्या केली की त्याचा खून झाला या प्रश्नांनी सारी जनता चक्रावली होती. त्याच्या फॅन्सना हा खून असल्याचा दाट संशय होता. केवळ देशभरच नव्हे तर जगभरातून त्याला न्याय मिळावा म्हणून असंख्य निदर्शने केली गेली. या प्रकरणाचा सीबीआय तपास चालू आहे अश्या समजुतीत गेली दोन वर्षे सारे होते. पण त्यांच्याकडूनही काही ठोस वक्तव्य न आल्याने सगळे संभ्रमात होते.
या पार्श्वभूमीवर आता एक नवेच धक्कादायक विधान समोर आले आहे. हे विधान कुणा साध्यासुध्या व्यक्तीकडून नव्हे तर सुशांतचे पोस्टमार्टेम करणार्या खुद्द रूपकुमार शाह यांच्याकडून आले आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खून असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते असे विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सुशांतला जेव्हा पोस्टमार्टेमसाठी टेबलवर आणण्यात आले तेव्हा त्यांनीच त्याला गुंडाळलेले कापड काढले. यावेळी जे त्यांनी पहिले त्यावरून ही आत्महत्त्या नसून हा खूनच आहे हा निष्कर्ष त्यांनी क्षणार्धात काढला. ते म्हणतात, “गेली 28 वर्षे मी 50 हजार ते 60 हजार मृतदेहांचे पोस्टमार्टेम केले आहे. त्या अनुभवावरून मी सांगतो की तो खूनच होता. सुशांतच्या गळ्यावर जखमांच्या दोन तीन खुणा होत्या. त्याचे हातपाय मुका मार लागल्यासारखे व तुटल्यासारखे दिसत होते. एवढी मारहाण झालेली व्यक्ती स्वतः गळफास कसा लावून घेऊ शकेल?”
तुम्ही त्यावेळी किंवा या दोन वर्षांत कुणाशी याबद्दल का बोलला नाहीत? असे विचारले असता ते म्हणाले. “प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते. मला गप्प बसण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळीच मी डॉक्टरांना संगितले होते की ही आत्महत्त्या वाटत नाहीये. पण आम्ही बघून घेऊ, तू तुझे काम कर असे मला संगितले गेले.”
मग आताच का हा खुलासा केलात असे विचारले असता रूपकुमार शाह म्हणाले, “आता मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्याचे समजले व सीबीआय सुद्धा यात कसोशीने तपास सुरू करीत आहे हेही समजले. त्यामुळे त्या चांगल्या जीवाला न्याय मिळावा असे मनापासून वाटायला लागले. म्हणून माझ्या जीवाची पर्वा न करता मी हा खुलासा केला आहे.”
रूपकुमार शाह यांच्या या गौप्यस्फोटाने पुढे काय घडते याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.