पुणे प्रतिनिधी :
दि. २७ एप्रिल २०२३
श्री स्वामी समर्थांचे शिष्य म्हणून सुपरिचित असलेले आणि गेल्या काही वर्षांत अफाट भक्तगण निर्माण झालेल्या सद्गुरू शंकर महाराजांचा ७६ वा समाधी सोहळा २८ एप्रिल २०२३ ला संपन्न होतो आहे. पुण्यात स्वारगेटपासून साधारण ४ ते ५ किमीवर धनकवडी येथे शंकर महाराजांची समाधी आहे.
श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ आहे. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. “रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.” ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच सुपड्या, कुंवरस्वामी, गौरीशंकर अशा नावांनीही ते ओळखले जात. आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. नाव जसे एक नाही, तसेच त्यांचे रूपही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. शंकर महाराजांच्या लीलांबद्दल सांगावे तेवढे थोडेच आहे. पण आजच्या युगातही अनेकांना त्यांच्या कृपेची प्रचिती आली आहे.
धनकवडी येथील मठात होणार्या समाधी सोहळ्यासाठी दरवर्षी अमाप गर्दी उसळते. दूरदूरच्या ठिकाणांहून भक्तगण बाबांच्या दर्शनासाठी येतात, त्यांच्या समाधीवर माथा टेकून धन्य होतात. बाबांनी स्वतःच म्हटले आहे, ” मै कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर – दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर….”
मठात येऊन भक्तगण एकच जयघोष करतात, “शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो!”