बारामती प्रतिनिधी :
दि. २५ मार्च २०२४
बारामती लोकसभा मतदारसंघात आता आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे यांच्यानंतर आता ओबीसी बहुजन आघाडीचे महेश भागवत हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत असे दिसते.
लोकसभा निवडणुका जवळ येताहेत तसतशा राज्यातील राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीने अद्याप सर्व मतदारसंघांमधीलआपले उमेदवार जाहीर केलेले नसले तरी ज्या मतदारसंघांमधले उमेदवार जाहीर केले गेलेत तिथे मित्रपक्षांमध्ये वाद असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे. असाच एक, संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ. या मतदारसंघात रोज वेगवेगळ्या नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. महायुतीकडून बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे इथे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उमेदवार पवार घराण्यातील आहेत. आशयातच पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता कंटाळली असल्याचा दावा करत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. शिवतारेंच्या या भूमिकेमुळे अजित पवार आणि महायुतीची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसते आहे. अशातच आणखी एक ट्विस्ट या मतदारसंघात आला आहे. तो म्हणजे ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांचा पक्षानेसुद्धा आता बारामती लोकसभा मतदारसंघात उतरण्याचे ठरवले आहे.
शेंडगेंच्या ओबीसी बहुजन आघाडीकडून दौंडमधील महेश भागवत हे बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ओबीसी बहुजन आघाडी बारामतीच्या मैदानात उतरल्यास नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा याला बरंच महत्त्व आलं आहे. मात्र, राज्यातील तमाम जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघामधील निवडणूक यंदा खूप अटीतटीची होणार यात काही दुमत नाही.
मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीत जागावाटपाच्या विषयावरून चर्चा सुरू असल्याचे समजले होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांना योग्य त्या जागा न मिळाल्यामुळे वंचितने आघाडीसोबत जाण्याचं विचार रद्द केला आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उदयास येण्याची दाट शक्यता आहे. कारण ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याचे समजते. या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेची निवडणूक एकत्र लढवण्यावर चर्चा झाल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
शेंडगे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी झाल्यास नक्कीच राज्यात राजकीय भूकंप येईल. दरम्यान, प्रकाश शेंडगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आतापर्यंत 3 बैठका झाल्याचे सूत्रांनी संगितले. 23 मार्चच्या बैठकीनंतर शेंडगे यांनी राज्यात तिसरी आघाडी होईल अशी शक्यता वर्तविली होती. शिवाय “आम्ही 22 जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे” असंही प्रकाश शेंडगे म्हणाले होते. त्यातच आता बारामतीमधून महेश शेंडगे मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.