भोर प्रतिनिधी :
दि. २८ मार्च २०२४
आज स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती. सारी जनता या पावन दिवशी छत्रपतींच्या स्मरणानं, अभिमानानं
भारावलेली असते. अवघा महाराष्ट्र या वीरपुरुषाच्या स्मरणानं त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला आपल्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली होती. याच प्रसंगाचं स्मरण ठेवत
सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज रायरेश्वर किल्ल्यावरील रायरेश्वराच्या मंदिरात यथासांग पूजा व अभिषेक केला. शिवरायांनी केवळ
आपल्या सर्वांसाठी मिळविलेल्या या स्वराज्याला सुराज्य बनविण्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
शिवजयंतीच्या या दिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या या उपक्रमाला प्रचंड संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. सौ. सुनेत्रावहिनी
अजितदादा पवार या अभिषेकानंतर जनतेशी संवाद साधताना म्हणाल्या,”छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेश्वराला आपल्या रक्ताचा
अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराची पूजा करून व त्याला आज तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीच्या पवित्र दिनी
अभिषेक करून मी कृतकृत्य झाले. शिवबांच्या याच स्वराज्याला सुराज्य बनविण्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून देईन. या मंगल कार्यात
आपली सर्वांची साथ मला लाभेल असा दृढ विश्वास मला आहे.”
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजितदादा पवार) पुणे शहराध्यक्ष प्रदीप गारटकर, इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.