मुंबई प्रतिनिधी :
दि. ३० मार्च २०२४
अजित पवार महायुतीत आल्यावरसुद्धा माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील तेढ कमी व्हायचं नाव घेत नाही. त्या
पराभवाचा वचपा विजय शिवतारे काढणार का? अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. मात्र, कालपर्यंत अजित पवारांची लायकी
काढणार्या शिवतारेंनी अचानक घूमजाव केलं आहे. पवार-शिवतारेंचे सूर जुळल्याचं आता दिसून येत आहे. विजय शिवतारेंची तलवार अखेर
म्यान झाली आहे. आता आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे अडचणीत येऊ नयेत म्हणून माघार घेत असल्याची सारवासारव करत शिवतारे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवतारे म्हणाले की, ”अजित पवारांच्या हाताने काही चुका झाल्याही असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा
निर्णय घेत आहोत. सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणूच. साडे पाच लाख मतं पवार विरोधी असली तरी यातील एक पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी तर एक पवार आमच्याकडे आहेत. त्यामुळं ही साडेपाच लाख मतं साहजिकच अजित दादांना मिळतील.
आम्ही आणि आमचे वरिष्ठ नेते त्यांना समजावून सांगू”.
गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे बहुतेकांच्या नजरा खिळल्या आहेत. विजय शिवतारेंच्या बारामती
मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून फेर्या चालू होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा आहे का? असा
सवालदेखील त्यांनी एका सभेमध्ये केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मध्यंतरी ते ६ – ७ तास थांबले होते. त्यावेळी
एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर तेव्हाही ठाम राहिले होते.
मात्र काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा राजकरणातल्या विचित्र विश्वाचा प्रत्यय आला. या बैठकीसाठी गृहमंत्री
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे एकत्र आले होते. गेल्या काही
दिवसांपासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली हे लक्षात घेण्याजोगे आहे. शिवतारे
यांनी अजित पवारांवर अनेकदा टीकाही केली होती. एवढं पाणी पुलाखालून वाहून गेल्यावर शिवतारेंना ही उपरती झाली आहे. राजकारणामध्ये
कधीही काहीही होऊ शकतं याचा पुनःप्रत्यय म्हणजे शिवतारेंचे हे घूमजाव आहे.