पुणे प्रतिनिधी :
दि. ०३ मार्च २०२४
ठाकरे शिवसेना व त्यातही त्यांचे नेते संजय राऊतांमुळे आघाडीत एन्ट्री होऊ न शकल्याच्या समजातून त्यांना पाठिंबा न देण्याची खेळी वंचितने खेळली आहे असे दिसते.
महाराष्ट्रात महाविकास आघाड़ीबरोबर लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याची बोलणी फिस्कटली आणि वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतंत्रपणे लढण्याचे ठरवले आहे. तसेच त्यांनी काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समर्थन दिले आहे. मात्र, हा पाठिंबा त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिलेला नाही. त्यामुळे साहजिकच त्याची आता जोरदार चर्चा आहे.
वंचितने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर केल्या आहेत, तर अगोदरच पाच जागांवर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काल त्यांनी हा पाठिंबा बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना जाहीर केला. मात्र, त्यांच्याच पक्षाचे म्हणजे आघाडीचे शिरूरमधील उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंना त्यांनी पाठिंबा दिलेला नाही, हे विशेष. उलट तेथे त्यांच्याविरोधात आपले उमेदवार मंगलदास बांदल हे उभे केले आहेत. त्यामुळे कोल्हेंच्या मतांवर परिणाम होणार हे निश्चित.
वंचितने मावळ मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील यांना अद्याप समर्थन दिलेले नाही. उलट तेथेही ते शिरूरसारखा उमेदवार देण्याची खेळी करतात की काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, एकूणच आघाडीला सरसकट पाठिंबा न देता तो अंशतः देण्याच्या वंचितच्या भूमिकेची चर्चा होते आहे यात नवल नाही. त्यातून त्यांनी सोईचे राजकारण केल्याचे ऐकायला मिळते आहे. कारण गतवेळी ते 58483 च्या लीडने विजयी झाले होते, तर त्याअगोदरच्या 2014 च्या निवडणुकीत विजयी आढळरावांचे लीड तब्बल 3 लाख 1 हजार 806 एवढे होते.
तर यावेळी वंचितच्या एन्ट्रीने शिरूरमध्ये गतवेळपेक्षा हे लीड आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळी तेथे निसटता विजय अथवा पराभव होणार आहे. एकूणच पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी (शिरूर) उमेदवार दिलाय आघाडीविरोधात , तर दुसरीकडे (मावळ) अद्याप उमेदवार न दिल्याने, त्यांच्या या ठिकाणी अंशतः पाठिंबा आणि विरोधी भूमिकेची चर्चा आहे.
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पार्टीच्या विधानसभेतील सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग वंचितने महाराष्ट्रात लोकसभेला या वेळी केल्याचे दिसून येते आहे. त्यांच्या कालच्या पाच जणांच्या दुसऱ्या यादीत एक मुस्लिम, एक लिंगायत आणि तीन मराठा आहेत. वंचितने पाचमध्ये तीन मराठा उमेदवार काल देण्याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन, मराठा समाजाने सत्ताधाऱ्यांविरोधात उघडलेली आघाडी हे असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे पु्णे आणि शिरूरच्या लढती आता दुरंगीच्या ऐवजी तिरंगी झाल्या आहेत. त्यातही पुण्यात वसंत मोरेंना त्यांनी तिकीट दिल्याने राज्यात ती लक्षवेधी झाली आहे, तर शिरूरमध्येही मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीमुळे ट्विस्ट आला असून, तेथे अगोदरच काट्याची असलेली ही टक्कर आता आघाडीच्या दृष्टीने आणखी कठीण झाली आहे.