मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२४
प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या महिन्यात १७ मार्च रोजी शेवटचा एपिसोड प्रसारित करून संपला. त्यानंतर आता निलेश साबळे, भाऊ कदम आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम’ ओंकार भोजने हे विनोदाचे तीन एक्के एका नव्या कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत.
सलग दहा वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया करून ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड पार पडला होता. डॉ. निलेश साबळेने त्याच्या काही दिवस आधीच हा शो सोडला होता. ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्याने असंख्य प्रेक्षक नाराज झाले होते. मात्र आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. निलेश साबळे मनोरंजनाचा धमाकेदार खजिना आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. निलेश साबळेसोबतच भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचीदेखील या कार्यक्रमात दमदार उपस्थिती असणार आहे. नीलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना भुरळ घातली होती. भाऊ कदमला या कार्यक्रमानेच लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. ओंकार भोजनेनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून प्रेक्षकांना तुडुंब हसवलं होतं. त्याचे यामधील, ‘अगं अगं आई’, सोटू इत्यादी पात्रं प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहातील. या कार्यक्रमाला निलेश साबळेच्याच एका प्रसिद्ध वाक्यावरून नाव दिलं आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, असं या कार्यक्रमाचं नाव असणार आहे.
डॉ. निलेश साबळे स्वतः ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्याबरोबर सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारही असणार आहेत. तर दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला, महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.