पुणे प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असतानाच्या काळात कठीण परिस्थितीत महिलांचे संघटन ज्यांनी मजबूत केले त्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीतील स्थिती कशी आहे? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या,
राज्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास आहे. सत्तेत राहातानाही सामान्य माणसांसोबतचा कनेक्ट ठेवून काम करण्याची राष्ट्रवादीची पद्धत विकसित झाली आहे. हा समतोल सांभाळणे राज्यातील फार कमी पक्षांना जमले असेल. सामान्य माणसाच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही लोकांसाठी झटणारा पक्ष अशी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक सोपी ठरणार आहे.
काम की भावनिक आवाहन, यातून लोक कामाची निवड करतील यावर आमचा विश्वास आहे. आमच्या कार्यकर्त्यांसोबतच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह आहे. मोठ्या ताकदीने आणि उत्साहाने महायुतीतील पक्ष काम करत आहेत कारण अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आमच्यासोबत आहे.
अजित पवार गटात जाण्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, धडाडीचे आणि विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार आणि हीच आमच्या पक्षाची ताकद आहे. अजित पवार हे राज्यभरातील तरुण कार्यकर्त्यांसाठी राजकारणातील रोल मॉडेल आहेत. अजितदादांची धडाडी, त्यांचा स्पष्टवक्तेपणा, दिलेल्या शब्दाला जागण्याची त्यांची वृत्ती आणि पक्ष-गट-तट असल्या भेदभावाला थारा न देता विकासकामे करण्याची वृत्ती यामुळे सर्व थरांत ते लोकप्रिय आहेत. राज्यातील सर्वात मोठे महिला संघटन आज आमच्या पक्षाकडे आहे हीसुद्धा खूप मोठी जमेची बाजू आहे. अजित पवार यांचे लोकाभिमुख नेतृत्व पाहून या महिला पक्षाबरोबर आलेल्या आहेत. आम्ही सर्व थरांतील महिलांसाठी, महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. महिलांसाठी अनेक क्रांतिकारी योजना राबविण्याचे काम महायुतीच्या सरकारनेही केले आहे, त्यामुळे या स्त्रीशक्तीची आम्हाला सोबत आहे जी एकूण मतदारांमध्ये पन्नास टक्के आहे.
आज महाराष्ट्रातील महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अधिकची ताकद अजित पवार यांच्या माध्यमातून आम्हाला मिळते आहे. महिलांच्या कल्याणासाठी महिला धोरणाच्या माध्यमातून आम्ही सत्तेत सहभागी झालो. २००२ साली अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये माझ्या सासूबाई रुक्मिणीनानी चाकणकर यांना उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्यानंतर प्रभागातील विकासकांमासाठी सर्वाधिक निधीही दादांच्या माध्यमातून मिळाला.
अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळेच आमचे राजकारण सुरू झाले. केवळ त्यांच्या सांगण्यावरूनच २००९ साली पक्षातील कोणतेही पद माझ्याकडे नसताना माझ्या बचत गटातील हजारो महिलांना बरोबर घेऊन लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. त्यावेळी सर्वाधिक मतदान माझ्या प्रभागातून आम्ही दिले. अनेक आंदोलने आम्ही पक्षासाठी केली, वेळप्रसंगी अटकही झाली, त्या काळात अजित पवार यांनी लढणा-या कार्यकर्त्यांना साथ दिली हे आमच्या कायम लक्षात आहे.
पुढे बारामतीच्या प्रचारात सुरुवातीपासून सक्रिय असण्याबद्दल त्या म्हणाल्या, बारामतीमधून आमच्या पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत. त्यांचे बारामतीच्या विकासकामांमध्ये मोठे योगदान आहे. आजवर त्यांनी जरी कधी आपल्या कामाचा प्रचार केला नसला तरी विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे हे सर्वजण जाणतात आणि त्यांनी केलेली विकासकामेच त्याचा पुरावा आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अजित पवार राज्य पातळीवर काम करत असताना त्या स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. ग्रामविकास, पर्यावरण, आरोग्य या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम अनेक आरोग्य शिबिरे घेऊन त्यांनी केले आहे.
ग्रामविकासाच्या क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कारही दिले गेले आहेत. त्यांच्यासारखी एक संयमी, कर्तबगार महिला संसदेत गेलीच पाहिजे, असे मला मनापासून वाटते. आम्हाला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून बारामती लोकसभा मतदार संघातील जनता अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांना नक्की पाठबळ देईल, याची खात्री वाटते.