दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२४
सुप्रीम कोर्टाकडून, घड्याळ चिन्ह वापरताना राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांना चिन्हाचा निकाल न्यायप्रविष्ट असल्याचे वर्तमानपत्रात जाहीर करावे, असे संगितले गेले होते तसेच चिन्ह वापरताना हा मजकूर त्या खाली लिहिण्याची सूचनाही केली होती. मात्र, ही सूचना पाळली जात नाही असे सांगत ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आक्षेप नोंदवला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर अवमानाचा ठपका ठेवण्याची मागणीदेखील त्यांच्यातर्फे करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून यासंदर्भात न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर अवमानाचा ठपका ठेवण्यासदेखील नकार दिला. तसेच दोन्ही बाजूंना त्यांनी समज दिली. आदेशाचे पालन करताना काही अटी शिथिल करण्याची मागणीदेखील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वकिलांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनी हे चिन्ह वापरण्याच्या विषयाबाबत आक्षेपार्ह पद्धतीने ट्विट केले होते. त्यावरदेखील वकिलांनी हरकत घेतली.
जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटचा विषय निघाला तेव्हा ते ट्विट डिलीट केले असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वकिलांनी सांगितले. यावर न्यायालयाने आव्हाड यांना तोंडी समज दिली. दरम्यान, असा आक्षेप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वकिलांनी घेतला की, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून घड्याळ चिन्हासंदर्भात ज्या जाहिराती वर्तमानपत्रात दिल्या आहेत त्यांमधील मजकूर सर्वत्र दिला गेला नाही.
त्यांना दिलेल्या चिन्हासह दोन्ही गटांनी निवडणुकीला सामोरे जावे, तसेच चिन्हांच्या वापराबाबत पूर्वीच्या निर्देशांचे पालन करावे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. कार्यकर्त्यांना चिन्ह वापरताना अश्या निर्देशाचे पालन करताना अडचणी येत असल्याचेही याप्रसंगी राष्ट्रवादी (अजित पवार) वकिलांनी न्यायालयाला सांगितले.