नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०६ एप्रिल २०२४
रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्याच्या हेतूने नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपल्या आरोपांना जोड म्हणून थेट जिवंत खेकडाच त्या
परिषदेत सादर केला होता. पण आता त्यांच्या या कृतीवर प्राणी अधिकार संघटना ‘पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल’ अर्थात PETA ही संघटना आक्रमक झाली आहे.
यासाठी ‘पेटा’ने थेट निवडणूक आयोग आणि शरद पवारांनाच पत्र लिहित रोहित पवारांवर कारवाईची मागणी केली आहे.
त्यांचं हे कृत्य पशू क्रूरता निवारण अधिनियमाच्या आदर्श आचारसंहितेसह निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं देखील उल्लंघन आहे असं पेटानं म्हटलं आहे. पेटा इंडियाच्या शौर्य
अग्रवाल यांनी, निवडणूक अधिकारी मिनल काळस्कर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, रोहित पवार पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा आणणार होते हे पूर्वनियोजित होतं आणि
व्हिडिओवरुन हे स्पष्ट होतं. एका जीवाला अनावश्यक त्रास देऊन पत्रकार परिषदेत स्टंट केला गेला आहे.
शौर्य अग्रवाल यांनी पुढे म्हटलं की, संशोधनाने हे स्पष्ट केलं आहे की खेकडे खूपच हुशार असतात त्यांना आपल्याला झालेला त्रास जाणवतो आणि वातावरणाची जाणीवही त्यांना
असते, त्यामुळं ते एकमेकांशी संवादही साधतात.
पेटानं रोहित पवारांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
पेटानं आपल्या पत्रात म्हटलं की, संघटनेनं निवडणूक आयोगाला या बाबीची माहिती दिली आहे. निवडणूक प्रचार सभा आणि रॅलीजसाठी प्राण्यांना त्रास दिला जातो आहे असं यामध्ये
म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारासाठी प्राण्यांच्या वापरावर यानंतर प्रतिबंध लावला होता.
सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक प्रचारादम्यान, गाई, बैल, हत्ती आणि गाढवांच्या वापरावर प्रतिबंध लावला होता
आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पेटानं रोहित पवारांना देखील पत्र लिहिले आहे आणि त्यांच्याकडून खेकडा
सोपवण्याची शिफारस केली आहे जेणेकरून खेकड्याची देखभाल केली जाईल.