मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ एप्रिल २०२४
काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे याचे कारण म्हणजे भिवंडी आणि सांगलीची उमेदवारी जाहीर करताना नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. या कृतीसंदर्भात आम्ही हायकमांडला प्रस्ताव दिला आहे असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
सांगली आणि भिवंडीत काही केल्यासर तिकडे त्याचे परिणाम होतील असे आपण आधीच बैठकीत सांगून आलो होतो. त्यानंतरही शरद पवार यांनी भिवंडीत उमेदवार जाहीर केला.
“वरिष्ठ नेत्यांकडूनही महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाहीये. आम्ही हायकमांडला प्रस्ताव दिला असून ते जे सांगितले ते आम्ही मान्य करू” असे पटोले पुढे म्हणाले. “पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन जागा तसेच मुंबईतील एका जागेचा प्रश्न होता. हा प्रश्न सामोपचाराने सोडवणे आवश्यक होते. परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नव्हते. यावर विचार करावा, अजूनही वेळ गेलेली नाही.” असेही नाना पटोले म्हणाले.
“विदर्भात आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळून घेतले असताना पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात वेगळे निर्णय घेतले जात आहेत. हे योग्य नाही. अशा पद्धतीने उमेदवार जाहीर करणे हे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करते. याचा परिणाम संपूर्ण राज्यातील निवडणुकीवर होण्याचा धोका आहे” असा इशाराही नाना पटोले यांनी दिलाय.
शेवटी ते म्हणाले, “आम्ही वंचितसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. आमची दोन जागा देण्याची तयारी आहे. माझा अधिकार कक्षेनुसार दोन जागा देण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. मतविभाजन होऊ देऊ नये अशी माझी विनंती आहे.”