मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०४ मे २०२१
नुकत्याच देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. निवडणूका संपताच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास 66 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्या मूळे नागरिकांच्या रोषास सरकारला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी वाढलं आहे. 27 फेब्रुवारीनंतर देशात पहिल्यांदाच इंधनाची दरवाढ झाली आहे. मधल्या काळात पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने इंधानांची किंमत ‘जैसे थे’ ठेवण्यात आली होती असं सांगण्यात येतंय. या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे सहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होतं. परंतू, या निवडणुका संपताच लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. या सर्व प्रकारास नागरिक कसे सामोरे जातील हे काळच ठरवेल.
मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ होऊन ती 96.95 रुपये तर डिझेलची आजची किंमत ही 87.98 रुपये इतकी झाली आहे.