पुरंदर प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२४
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघ या ना त्या करणाने कायम चर्चेत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा
पवार अशी नणंद-भावजयीमध्ये येथून लढत होते आहे. मात्र, यादरम्यान, महाविकास आघाडीतील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शिंदे गटातील विजय शिवतारेंनी विरोधी भूमिका
घेऊन अजितदादांचे टेन्शन वाढवले होते. अखेर त्यांचे बंड थंड करण्यात वरिष्ठांना यश आले. या घडामोडींनंतर आज सोमवारी (ता. ८) सुनेत्रा पवारांनी प्रथमच विजय शिवतारेंची भेट
घेतली.
सुनेत्रा पवारांनी शिवतारेंची सासवड येथील निवासस्थानी, त्या पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना भेट घेतली. सासवडमधील जनसंवाद सभेच्या तयारीबाबत त्यांच्यात यावेळी चर्चा
झाली. या भेटीत तुम्ही दिल्लीला जा, आम्ही तालुका सांभाळू, असे आश्वासन देऊन शिवतारेंनी, आपण सुनेत्रा पवारांचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काम करणार असल्याचे स्पष्ट
केले.
याआधी, अजितदादांविरोधात बोलताना ते म्हणाले होते, “काही झाले तरी लोकसभा निवडणूक लढणारच!” आता मात्र महायुतीचा धर्म पाळण्याचे संकेत देत शिवतारेंनी यू टर्न
घेतल्याची चर्चा आहे.
सुनेत्रा पवारांनी, बारामतीतून उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत मिळताच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. यातून, सहाही विधानसभा मतदारसंघांतील नेत्यांशी
त्यांच्या भेटी-गाठी झाल्या होत्या. निवडणुकीत सहकार्य मिळावे, यासाठी त्यांनी भोर वेल्हेचे आमदार तथा महाविकास आघाडीचे नेते संग्राम थोपटे यांचीही भेट घेतली होती. मात्र
महायुतीत असूनही सुनेत्रा पवारांनी, विजय शिवतारेंची भेट घेण्याचे टाळले होते. त्यानंतर शिवतारेंनी बंडाचा सूर लावला होता. मात्र आता वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर त्यांनी लोकसभा
निवडणुकीतून माघार घेत महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याचे जाहीर केले आहे. यानंतर सुनेत्रा पवारांनी शिवतारेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.
या, सासवड येथे झालेल्या उभय नेत्यांच्या भेटीवेळी शिवतारेंच्या कन्या ममता लांडगे-शिवतारे यांच्यासह महायुतीचे नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सुनेत्रा पवारांना,
शिवतारेंनी, ‘तुम्ही दिल्लीत जा, आम्ही तालुका सांभाळू,’ असे सांगितल्याचे समजते. शिवतारे पवारांना दिल्लीला पाठवण्यासाठी कशी रणनीती आखणार? पुरंदर विधानसभेतून सुनेत्रा
पवारांना किती लीड मिळणार? असे औत्सुक्य या भेटीने राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे.