मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ एप्रिल २०२४
गेले काही दिवस महाविकास आघाडीत जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. विशेषत: टोकाचे मतभेद शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीची भिवंडीची मागणी होती, तर दुसरीकडे शिवसेनेने परस्परच सांगलीचा उमेदवार जाहीर करून टाकला होता. मुंबईच्या जागांवरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. यातच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.
“महाराष्ट्रात जागा वाटपामध्ये चुका झाल्या. वाटप करताना आधी मतदारसंघ ठरवायला हवा होता आणि तिन्ही पक्षांना प्रत्येक विभागात किमान एक जागा मिळावी या हेतूने फॉर्म्युला निश्चित करायला हवा होता,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
याबरोबरच या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या घेणं आवश्यक होतं. मतदार संघ आणि उमेदवार या दोन्ही गोष्टी एकत्र ठरवल्याने साहजिकच गोंधळ उडाला. पक्षाच्या समन्वय समितीच्या हातातून हा विषय आता गेलेला आहे कारण उमेदवारच मतदारसंघावर दावा करू लागले आहेत . ज्या काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या. विशेषतः सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागा नक्की करताना चुका झाल्या. सांगली, दक्षिण मध्य मुंबईबाबत काही मार्ग निघण्याची शक्यता आहे. जे काही असेल ते थोडेफार मान्य करुन आम्ही पुढे जावू.”
देशात ‘इंडिया’ आणि राज्यात महाविकास आघाडीबरोबर जागा वाटपाची चर्चा झाली तेव्हा काँग्रेस बॅकफूटवर होती का? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारमध्ये नितीश कुमार हे बरोबर न आल्यानं मोठा झटका ‘इंडिया’ आघाडीला निश्चितच बसला आहे. ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार एकत्र आल्याने जो फरक पडला असता, तो फायदा आता मिळणार नाही. बंगाल आणि बिहारसह काश्मीरमध्येसुद्धा एकास एक उमेदवार देणं गरजेचं होतं. पण, इंडिया’ आघाडी, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि दाक्षिणात्य राज्यांत’ झाली. आघाडीची शक्यता दिल्लीत आपसोबत कमी होती. परंतु, तिथेही आघाडी झाल्यामुळे काही प्रमाणात यश मिळण्याची शक्यता बळावली आहे.”
महाविकास आघाडीला कसा प्रतिसाद मिळेल? यावर बोलताना चव्हाणांनी म्हटलं, “आम्ही तीन पक्ष एकत्र आल्यावर प्रचंड ताकद तयार होते हे दिसतंच आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात तसेच कसब्याच्या पोटनिवडणुकीत आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. ईडी, सीबीआयच्या कारवाईमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार गेले असले तरी लोक त्यांच्या मागे गेले नाहीत. आम्हां तिन्ही पक्षांचे जमिनीवरील संघटन मजबूत आहे.”