मुंबई प्रतिनिधी :
दि. १० एप्रिल २०२४
सोशल मीडिया एक्सवर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला तर राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे . या पोस्टमध्ये त्यांनी मंगेश पाडगावकरांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता विडंबनात्मक पद्धतीने शेअर केली आहे.
काल गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका असणार हे जाहीर केलं. अनेक दिवसांपासून या चर्चा रंगल्या होत्या की, राज ठाकरे महायुतीत जाणार का? किंवा ते कोणती जागा लढवणार? मात्र, या सर्व चर्चांना राज ठाकरे यांनी पूर्णविराम देत आपण केवळ नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं.
राज ठाकरेंची भूमिका भाजपला फायदेशीर असल्याने यावरुन आता अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपसह महायुतीतील मित्रपक्षांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे तर आघाडीचे नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. मी एखाद्यावर प्रेम केलं तर टोकाचं प्रेम करतो आणि विरोधही टोकाचा करतो! असं कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
याचाच आधार घेऊन आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं “यांच” आणि “त्यांच” सेम नसतं, अशी एक कविता त्यांनी शेअर केली आहे.
शेलारांनी शेअर केलेली कविता अशी आहे –
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, “यांच” आणि “त्यांच” सेम ‘नसतं’!
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, “यांच” बिनशर्त असतं आणि “त्यांच” मुख्यमंत्री पद मागतं !
त्यासाठी देव, देश आणि धर्मावर पाणी ही सोडतं!
प्रेम.. “यांच” आणि “त्यांच” सेम नसतं !
कवितेच्या खाली त्यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांची त्यांनी क्षमाही मागितली आहे. कारण ही मूळ कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिली आहे. आशिष शेलार हे अनेकदा शिवसेना ठाकरे गटावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. अशातच आता त्यांनी, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी आपली विचारधारा सोडल्याची टीका केली आहे. शिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या प्रेमात फरक असल्याचंही त्यांनी या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.