मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला जाहीर सभा घेत लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीला नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठींबा देण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. महायुतीतून राज ठाकरेंच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे मात्र मनसेतीलच काही कार्यकर्ते यावर नाराज आहेत. राज यांच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त करत मनसे सरचिटणीस किर्ती कुमार शिंदे यांना राजीनामा दिला. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर आपले मत व्यक्त केले आहे.
‘कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करणार? मतं वेगळी असू शकतात तरी ती पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावीत, असं मला वाटत नाही. राजीनामे दिलेले कार्यकर्ते काही महत्त्वाचे लोक नाहीत.’ असा प्रकाश महाजन यांच्या बोलण्याचा रोख होता.
तसेच महाजन यांनी, राज ठाकरे सतत भूमिका बदलत असतात, या होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. काही भूमिका सतत बदलत असल्या तरी आमची हिंदुत्वाची आणि महाराष्ट्रासाठीची भूमिका कधीच बदललेली नाही. फायद्यासाठी राज ठाकरे कोणाशी नाते जोडत नाही, अशी कोपरखळी महाजन यांनी मारली.
राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय विचारपूर्वक तसेच हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन घेतलेला निर्णय आहे. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा या देशाचं हित महत्त्वाचं आहे. 370 कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी मोठा मोर्चासुद्धा काढला होता. असे सांगून महाजन यांनी राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठींब्याचे समर्थन केले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिला असला तरी महायुतीच्या प्रचारात सहभाही व्हायचे की नाही याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. 13 एप्रिलला राज ठाकरे जी बैठक घेणार आहेत, त्या बैठकीत या विषयी निर्णय घेण्यात येईल, असे प्रकाश महाजन म्हणाले.