नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १२ एप्रिल २०२४
पाच फेब्रुवारी रोजी म्हणजे सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी लोकसभेचे आपले टार्गेट जाहीर केले होते. त्यांनी फक्त ‘अब की बार…’ म्हणताच त्यांच्या खासदारांनी ‘चार सौ पार’ची घोषणा दिली होती. नंतर ही घोषणा भाजपच्या निवडणूक प्रचाराचा मंत्रच बनली.
भाजपला टक्कर देण्यासाठी शक्य तेवढ्या जागांवर ‘इंडिया’ आघाडीचे पक्षाला रोखण्याचे व सत्तावापसीचे गणित बिघडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा सुमारे चाळीस मतदारसंघांवर, ज्या मतदारसंघांत भाजपचे उमेदवार हे ५० हजारांपेक्षा कमी मताधिक्याने जिंकलेले आहेत, विशेष लक्ष इंडिया आघाडीने केंद्रित केले आहे. यामध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील काही जागांचा समावेश असल्याचे समजते. उत्तर प्रदेशातील सहा, झारखंडमधील दोन, पश्चिम बंगालमधील चार, कर्नाटकमधील दोन आणि छत्तीसगड, हरियाना, बिहार व पंजाबमधील प्रत्येकी एका जागेवर ‘इंडिया’ आघाडीने लक्ष केंद्रित केल्याचे समजते.
भाजपविरोधात लढणाऱ्या बहुजन समाज पक्षालाही(बसप) मागील लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ३० हजारांपेक्षा कमी मतांनी सहा जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यातील मछलीशहर ही जागा तर भाजपने अवघ्या १८१ मतांनी तर मेरठची जागा ४७२९ मतांनी जिंकली होती. त्यामुळे बसप ‘इंडिया’ आघाडीत नसला तरी त्यांना चाचपले जात आहे. ‘बसप’ स्वतंत्रपणे उत्तरप्रदेशात निवडणूक लढवीत आहे. ‘इंडिया’ आघाडी चाचपणी करीत आहे की, या पक्षाच्या प्रभावाखालील मतदारसंघांमध्ये भाजपविरोधात आयत्यावेळी वेगळा विचार करता येईल काय?
भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य दहा हजारांहून कमी असलेल्या पाच ठिकाणी काँग्रेसला भाजपकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामध्ये कर्नाटकमधील चामराज नगर, झारखंडमधील खुंटी, हरियानातील रोहतक यासह केंद्रशासित दीव दमणच्या जागेचा समावेश आहे.
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील चंदोली, कन्नौज, बदायूँ, बलिया, फिरोजाबाद आणि कोशंबी या भाजपकडून ४० हजारापेक्षा कमी मतांनी गमावलेल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.
यात पराभवाचा फरक २० हजारापेक्षाही कमी मतांचा असलेले चार मतदारसंघआहेत. पश्चिम बंगालमधील वर्धमान- दुर्गापूर, बराकपूर , झारग्राम व बालूरघाट या मतदारसंघांमध्ये ३५ हजारांपेक्षाही कमी मतांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार भाजपकडून हरले होते. त्यामुळे ‘तृणमूल’ही या मतदारसंघांकडे विशेष लक्ष देत आहे.
भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी, स्वबळावर ३७० जागा तर ‘एनडीए’ आघाडीसाठी ४०० हून अधिक जागा जिंकण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत मते मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी लहान पक्षांबरोबर प्रभावशाली चेहऱ्यांनाही सोबत घेण्याची योजना आखण्यात आली आहे.