नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १३ एप्रिल २०२४
हिंदुत्वाची कास धरून काम करणार्या जनसंघाचे पहिल्या निवडणुकीत ३ खासदार निवडून आले होते. मात्र १९७१ च्या निवडणुकीत जनसंघाच्या खासदारांची संख्या दोन अंकी झाली.
यंदाच्या लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने’अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. याआधी लागोपाठ दोन वेळा या पक्षाची देशात एकहाती सत्ता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तिसऱ्यांदा देशात आपलंच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आज 400 च्या पुढे जागा मिळवण्याची इच्छा बाळगलेल्या या पक्षाचे कधीकाळी केवळ 3 असलेले खासदार पुढे 303 पर्यंत गेले. जनसंघाच्या 3 खासदारांपासून भाजपच्या आज 303 खासदारांपर्यंतची राजकीय घौडदोड मोठी रंजक आहे.
भारतामध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतर 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. काँग्रेसला या निवडणुकीत चांगले यश मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेसला 489 पैकी 464 जागा मिळाल्या. स्वातंत्र्य काळातील काँग्रेसच्या योगदानाने देशातील जनतेच्या मनात घर केलं होतं.काँग्रेसचं वर्चस्व या काळात एवढं होतं की विरोधी पक्ष केवळ निमित्तमात्र उरले होते.
विरोधी पक्षांमध्ये जनसंघ हा एक पक्ष होता. हा पक्ष हिंदुत्वाची कास धरून काम करत होता. या पक्षाचे ३ खासदार पहिल्या निवडणुकीत निवडून आले होते. 1971 च्या निवडणुकीत या पक्षाच्या खासदारांची संख्या दोन अंकी होऊन या निवडणुकीत त्यांचे 22 खासदार झाले. जनसंघ 1977 आणि 1980 च्या निवडणुकांमध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढला. जनसंघ आणि जनता पक्ष पुढे 1980 मध्ये वेगळे झाले आणि त्याचवर्षी जनसंघाचे नामकरण भारतीय जनता पक्ष असे झाले.
1989 मध्ये देशात 85 जागांवर जनसंघाला यश मिळाले तर काँग्रेसला 197 जागांवर. पुढे 1991 मध्ये काँग्रेसला 244 आणि भारतीय जनता पक्षाला तब्बल 121 जागांवर यश मिळालं. त्यानंतर भाजपच्या खासदारांची ३ अंकी संख्या कायम राहिली. 1999 च्या लोकसभेत काँग्रेसचे 114 तर भाजपचे 182 खासदार होते. भाजपला 138 आणि 116 जागा यानंतरच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळाल्या.
2014 मध्ये मोदी लाट सगळ्यांनी अनुभवली. भाजपने एकहाती सत्ता मिळवली ती केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे! 2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपला खूप मोठं यश मिळालं. अवघ्या देशाने यावेळी मोदींचा करिष्मा पाहिला. या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला आल्या तब्बल 282 जागा आणि देशात एनडीएचं सरकार आलं. तर त्यानंतरच्या 2019 च्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी सरकारचा नारा घुमला आणि मोंदीपसंती देत देशातील जनतेने पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्त्वातील भाजपला विजयी केलं. या निवडणुकीत भाजप 300 पार झाला आणि त्यांचे 303 खासदार निवडून आले. साहजिकच या पक्षाच्या आपेक्षा आता वाढल्या असून २०२४ मध्ये आपण ४०० पार जाऊ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाचा हा चढता आलेख या निवडणुकीतही असाच राहणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेची अशी आहे कहाणी –
भारतीय जनता पक्ष हा आणीबाणीपूर्वी ‘भारतीय जनसंघ’ या नावाने कार्यरत होता. जनसंघाची स्थापना 21 ऑक्टोबर 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली. मोठ्या प्रमाणात आरएसएसचे स्वयंसेवक असलेले लोक या पक्षाचे कार्यकर्ते हे होते.
आणीबाणीमुळे विरोधकांची एकजूट –
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यांनी आपल्या सर्व विरोधकांना या काळात तुरुंगात घातलं. जनतेच्या तीव्र विरोधाचा परिणाम म्हणून 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्या आवाहनानुसार देशातील सर्व विरोधी पक्ष जनता पक्षाच्या नावावर एकत्र आले.
त्यामध्ये भारतीय जनसंघही विलीन झाला आणि १९७७ ची निवडणूक विरोधकांनी जनता पक्षाच्या नावावर लढवली आणि या निवडणुकीत इंदिरा गांधीचा पराभव केला. यानंतर जनता पक्ष सत्तेत आला परंतु जनसंघाचे नेते जनता पक्षातून, वैचारिक मतभेदांमुळे बाहेर पडले आणि 6 एप्रिल 1980 रोजी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपची स्थापन केली.