मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ एप्रिल २०२४
मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी आज (शनिवारी) पुढील दिशा ठरवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. राज ठाकरे यांनी या बैठकीनंतर आपण दिलेल्या पाठींब्याचे समर्थन केले. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले नसते तर राम मंदिर देखील पूर्ण झाले नसते, असे राज ठाकरे स्पष्टपणे म्हणाले.
बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जाणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, मी महायुतीच्या प्रचारासाठी सकारात्मक आहे. मात्र प्रचारसभा कुठे घ्यायची याबाबत अजून निर्णय झालेला नाही. निवडणुका आल्या की मैदानं बुक केली जातातच. त्यामुळे सभा होतच असतात. त्याबाबत आता काय करायचे ते पाहू.
महायुतीला मनसेकडून पाठींबा देण्यात आला असला तरी आमच्या कोणत्या लोकांशी, महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीन पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी संपर्क करायचा, याची यादी दोन दिवसात तयार होईल. ही यादी कुठलाही घोळ व्हायला नको म्हणून तयार करण्यात येणार आहे असेही राज ठाकरेंनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत आदेश देऊनही, पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिले नसते. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक वाटले कारण काही चांगल्या गोष्टी होताना दिसायला लागल्या आहेत. यामुळेच मनसेने मोदींना पाठिंबा द्यायचे ठरवले, असे राज ठाकरे म्हणाले. मोदींच्या पहिल्या पाच वर्षातल्या गोष्टींना मी विरोध केला हे बरोबर आहे. पण त्यामुळे मी भूमिका बदलल्याचं अनेकजण सांगतात. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत. त्यावेळेस धोरणांवरती टीका म्हणतात, तशी टीका मी केली होती, असे राज ठाकरे म्हणाले.