अकोला प्रातिनिधी :
दि. १७ एप्रिल २०२४
मंगळवारी छत्रपती संभाजीनगर मधील सभेत एआयएमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघातून एआयएमआयएमचा पाठिंबा जाहीर केला. यावर तिखट प्रतिक्रिया वंचित आघाडीचे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अफसर खान यांनी दिली आहे. संभाजीनगरातून एआयएमआयएमच्या पतंग गुल झाला आहे, म्हणूनच ओवेसी हे पाठिंबयाचे नाटक करत असल्याचा आरोप खान यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात काँग्रेसचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. इम्तियाज जलील आणि वंचितच्या समर्थकांमध्ये खान यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर वॉर रंगले होते. एकमेकांची छायाचित्रे पोस्ट करत दोन्ही बाजूंनी चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार सुरू झाला.
दरम्यान तीन दिवसांपासून संभाजीनगरात मुक्कामी असलेल्या ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी शहागंज येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला. यामागे एआयएमआयएमचा, प्रकाश आंबेडकर यांना मानणारा दलित समाज आणि त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा डाव असल्याचे बोलले जाते.
अद्याप ‘एआयएमआयएम’ने जाहीर केलेल्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर किंवा ‘वंचित’च्या कुठल्याही राज्यस्तरावरील नेत्यांनी अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करणे म्हणजे एमआयएमची नौटंकी असल्याचे ‘वंचित’चे संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार अफसर खान यांनी म्हटले आहे.
हिंदू मतांमध्ये झालेले विभाजन गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्या पथ्यावर पडले होते. परंतु इम्तियाज जलील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कुठल्याच प्रकारचा विकास केलेला नाही. शिवाय दलित बांधवांची एकगठ्ठा मते जी वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना मिळाली होती, ती त्यांच्यापासून दूर गेली आहेत.
त्यामुळे आता पतंगाची हवा गुल झाल्याचा अंदाज छत्रपती संभाजीनगरातून ओवेसी आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना, खासदाराला आला आहे. म्हणूनच त्यांनी न मागता प्रकाश आंबेडकर यांना एकतर्फी पाठिंबा जाहीर करून नाटक केले आहे. परंतु त्यांच्या या खेळीला, वंचित बहुजन आघाडीला मानणारा गोरगरीब, वंचित घटक आणि वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नाही आणि इम्तियाज जलील यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अफसर खान यांनी दिला.