नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १९ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या अर्ज रद्द प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघातून जवाहर कुमार झा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, मात्र त्यांचा अर्ज रिटर्निंग अधिकाऱ्याने रद्द केला होता. त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात यानंतर धाव घेतली होती.
त्यांच्या याचिकेत जवाहर कुमार झा यांनी दावा केला आहे की, रिटर्निंग अधिकाऱ्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी मनमानी आणि बेकायदेशीरपणे रद्द केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान म्हणाले, “तुम्ही कलम ३२ अन्वये अशी याचिका दाखल करू शकत नाही. तुम्हाला निवडणूक याचिका दाखल करावी लागेल.”
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “जर सुप्रीम कोर्ट, उमेदवारी अर्ज नाकारल्याच्या प्रकरणांची दखल घेऊ लागले तर निवडणुकीत अराजकता माजेल. आम्ही नोटीस बजावल्याने अशा प्रकरणांवर सुनावणी होऊ लागल्या तर निवडणूक प्रक्रिया विस्कळीत होईल. तुम्हाला निवडणूक नियम आणि कायद्यांची शिस्त ही पाळावी लागेल. उमेदवारी अर्ज फेटाळल्याच्या विरोधातील याचिका स्वीकारण्यात आम्हाला रस नाही!”
उमेदवारांचे नामांकन अर्ज फेटाळण्यात भारतभरातील निवडणूक रिटर्निंग अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून, याला आळा घालण्यासाठी वकील आलोक श्रीवास्तव यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. उमेदवाराला किमान एक दिवस, निवडणूक अर्जात चिन्हांकित केलेली प्रत्येक चूक दुरुस्त करण्यासाठी अधिकची संधी देण्याचे निर्देश संपूर्ण भारतातील निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती.