मुंबई प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२४
प्रमुख पक्षांनी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी केवळ दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळे साहजिकच निवडणूक प्रचाराला अजून रंग चढलेला नाही; मात्र बऱ्याचदा बैठका आणि चर्चा होऊनदेखील उमेदवार ठरत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकागोंधळलेले आहेत. अनेक पक्षांचा सहभाग आघाड्या आणि युत्यांमध्ये असल्याने आणि नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार, हे जाहीर झाले नसल्याने कार्यकर्त्यांनादेखील सबुरीने घेण्याची वेळ आली आहे.
शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगरातील मतदान प्रक्रिया होत असल्याने राजकीय पक्षांच्या हातात अजून वेळ आहे. त्यामुळे सारेचजण उमेदवारांची घोषणा करण्यासाठी वेळ घेत आहेत. काही उमेदवारांची घोषणा झाली असल्यामुळे काही पक्षांकडून त्यांचा प्रचार सध्या सुरू झाला आहे; मात्र उमेदवारी निश्चित नसल्यामुळे दुसरीकडे कार्यकर्ते अजूनही शांत असल्याचे दिसते आहे.
दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ वगळता मुंबईतील इतर चार मतदारसंघांत अजूनही राजकीय संभ्रम कायम आहे. या मतदारसंघांत अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार निश्चित झाले नसल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर ठाकरे गटाचे अनिल देसाई हे मैदानात आहेत; तर ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील ठाकरे गटाकडून तर मिहीर कोटेचा भाजपतर्फे रिंगणात आहेत. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंतांचा आपल्या प्रचारावर जोर आहे; तर उत्तर मुंबईत भाजपने पियूष गोयल यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही आपला प्रचार जोरदारपणे चालवला आहे.