सूरत प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२४
भाजपने मुकेश दलाल यांना सुरत लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधातील कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने व इतरांनी आपला अर्ज मागे घेतल्याने ते सूरतमधून बिनविरोध निवडून येणारे पहिले उमेदवार ठरले आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या चार दिवसांवर आलेले आहे. याचदरम्यान भाजपसाठी मोठी खुशखबर आली आहे. गुजरातमधील भाजपच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित झाला आहे, एवढेच नव्हे तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना विजयाचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. जे काही घडले ते भाजपच्या पथ्यावर पडले हे मात्र नक्की. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि त्यानंतर इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज उरला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपला देशातील पहिला विजय गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये मिळाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी होऊन ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व आठ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपला देशातील पहिला विजय गुजरातमध्ये (सूरत) मिळाला आहे. चार जून आधीच भाजपच्या पारड्यात एक जागा पडली आहे.
काँग्रेसचे सूरतमधील उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज कालच बाद करण्यात आला आहे. भाजपकडून तीन सूचकांच्या सह्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर तीन सूचकांना निवडणूक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण ते हजर न झाले नाहीत. त्यामुळेअर्ज बाद करण्यात आला आहे. काँग्रेसच्या डमी उमेदवाराचा अर्जदेखील बाद करण्यात आला होता. यानंतर भाजपच्या उमेदवारासह रिंगणात उरलेल्या नऊ उमेदवारांपैकी आठ जणांनी माघार घेतली.