अमरावती प्रतिनिधी :
दि. २३ एप्रिल २०२४
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी, भाजप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी आक्रमक असून, प्रशासनाच्या मदतीने ते अमरावतीचे सायन्स स्कोअर मैदान ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. २४ एप्रिल रोजी प्रहारची सायन्स स्कोअर मैदानावर सभा होईल, असे स्पष्ट करत २३ एप्रिलपासून आम्ही ते मैदान ताब्यात घेऊ, असेही त्यांनी सांगितले. या सभेसाठीची प्रहारची बुकींग असून, त्यासाठी पैसे भरल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला. आता मैदान नाकारल्याच्या कारणावरुन कडू आणि पोलिस यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे.
बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखल्यानंतर पोलिस आणि कडू यांच्यात जोरदार वाद झाला. कडू म्हणाले, “अमित शाह जर नियम तोडून सभा घेत असतील तर आता काय शिल्लक राहिलं? बदल्या होऊ नयेत म्हणून केवळ पोलिस भाजपच्या कार्यकर्त्यांसारखं वागत आहेत. अमित शाहांच्या सभेसाठी परवानगी असेल तर मला ती का दाखवत नाही? याचा अर्थ शाहांच्या सभेला परवानगी न मिळताच सभा होणार आहे.”
पोलिस अधिकारी गणेश शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. कडू म्हणाले, “भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे तुम्ही पोलिस वागत आहात, भाजपचा दुपट्टा तुम्ही घालून या. हे मैदान मी अमित शाह यांच्या आधी बुक केले आहे. प्रशासनाने त्यासाठी मला परवानगी दिली आहे. असे असताना ऐनवेळी अमित शाह यांची सभा कशी काय होऊ शकते? देशात लोकशाही, नियम, कायदा शिल्लक नाही का? असे कडू म्हणाले.