पुणे प्रतिनिधी :
दि. २४ एप्रिल २०२४
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे आणि बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराव कुंजीर यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून संभाजीराव कुंजीर हे सक्रिय राजकारणापासून अप्लित आहेत. पुन्हा ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संभाजी कुंजीरांनी त्यांच्या समर्थकांसह, अजित पवार यांच्या पुणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुंजीर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती.
संभाजीराव कुंजीर हे १९८० मध्ये माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा पराभव करून निवडून आले होते. कुंजीर यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील (अजितदादा) प्रवेशानंतर पुरंदर तालुक्यातील अनेक गावातील आजी- माजी सरपंच व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
माजी आमदार संभाजीराव कुंजीर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार गावागावात पोचवून पुरंदर तालुक्याचा विकास करण्यासाठी मी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. बारामती लोकसभा निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
यावेळी माजी नगराध्यक्ष मोहन वांढेकर, पुरंदर पंचायत समितीचे सदस्य बाळुतात्या यादव, साहित्यिक दशरथ यादव, विठ्ठल कटके, एम के गायकवाड, पोपटराव ताकवणे, हिरामण खेडेकर, उत्तम चव्हाण, सागर चव्हाण, अण्णा यादव, गणेश यादव, राजू कुंजीर, प्रवीण कदम अॅड. मेमाणे आदी उपस्थित होते.