बारामती प्रतिनिधी :
दि. २६ एप्रिल २०२४
मलाही निधी देताना आनंद होईल जर आपल्या उमेदवारासमोरील बटन दाबले तर, असे विधान बारामतीतील एका प्रचार सभेत अजित पवारांनी केले होते.
त्यावरून त्यांची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीवर अजित पवारांना अधिकाऱ्यांनी क्लीन चिट दिली आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार असे समजते की, गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबाबतचा अहवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सादर केला आहे. या अहवालात पवारांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बारामतीतील प्रचार सभेत अजित पवारांनी म्हटले होते की, ‘तुम्हाला हव्या असलेल्या निधीसाठी आम्ही मदत करू. पण तुम्हीही आमच्या उमेदवारासमोरील बटन दाबावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे निधी देताना आम्हालाही बरं वाटेल.’ यावरून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.
तक्रार आल्यानंतर आम्ही चौकशी केली असे निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी म्हणाल्या. त्यानुसार अजित पवारांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या उत्तरात हे काही अंशी सत्य असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्या विधानाबाबतचा व्हिडिओ आम्ही पाहिला. त्यानंतर त्यांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या आढळून आले.
अजित पवारांनी मतदान करण्याबाबत कोणत्याही उमेदवाराचे नाव घेतलेले नाही. ते, बटन दाबा असे म्हणताना दिसत आहेत. त्यानुसार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मी माझा अहवाल सादर केला आहे. संबंधित प्रचार सभेसाठी आधी परवानगी घेतलेली होती, असेही द्विवेदी यांनी संगितल्याचे समजते.
दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बारामतीत लढत होत आहे. पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उभे ठाकले आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष बारामतीमधील लढतीकडे लागले आहे.