पुणे प्रतिनिधी :
दि. २७ एप्रिल २०२४
निवडणुकीच्या तोंडावरती भोर परिसरातील एमआयडीसीचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचा पाहायला मिळत आहे. नेत्यांकडून निवडणूक आल्यानंतर भोर आणि राजगड (वेल्हा) परिसरात एमआयडीसी उभारण्याच्या घोषणा करण्यात येतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका होताच नेत्यांना याबाबतचा विसर पडत असल्याचं चित्र भोर आणि वेल्हेकर अनुभवत आहेत. यंदादेखील एमआयडीसीच्या मुद्द्यावरून भोरचे राजकारण तापले आहे आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच मुद्द्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना जाब विचारला आहे.
आज बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मेळावा घेतला. ही निवडणूक भावकीची आणि भावनिक नाही असे मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार म्हणाले.
भोर, वेल्हेकरांना काही लोक एमआयडीसीचं स्वप्न दाखवून गेले. २०१४ ला एमआयडीसीच्या मुद्द्यावरती मतं मागितली. हे एमआयडीसीचं काम मात्र पूर्ण केलं नाही. तेच लोक तरीदेखील २०१९ ला मतं मागायला आले होते आणि आताही ते मतं मागत आहेत. मी त्यांच्या जागी असतो तर मला लाज वाटली असती. कोणत्या तोंडाने आता ते मत मागताहेत, असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना केला.
लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर भोर परिसरातील एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी लगेच प्रयत्न करणार आहे असं अजित पवार यांनी सांगितलं. यासाठी जागेबाबतचा प्रस्ताव स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आपल्याला द्यावा असंदेखील अजित पवार म्हणाले. आत्ताच्या खासदारांनी जी कार्यपुस्तिका छापली आहे, त्यात मी केलेली कामं छापली आहेत. मी केलं… मी केलं… असं ते सांगत आहेत. मात्र, भोर साठी या खासदारांनी काय केलं हे सांगावं असे म्हणत अजित पवार यांनी, नुसती भाषणं करून विकास होत नसतो, असा टोलाही सुळे यांना लगावला.
तुम्ही तीन वेळा सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं आता सुनेत्रा पवार यांना निवडून द्या, मी तुम्हाला एमआयडीसी देणार आहे असे सांगत मी शब्दाचा पक्का असल्याचं अजितदादा म्हणाले. करारानुसार भोर वेल्हा परिसरामध्ये असलेल्या धरणांचे पाणीवाटप करून पाणी योजना भोर वेल्हा भागासाठी राबवणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं, तसेच या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभले असल्याने, पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनदेखील उपाययोजना करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. आपण यासाठीचा निधी मंजूर करून आणू, असा विश्वास त्यांनी या वेळी दर्शवला.