शिरूर प्रतिनिधी :
दि. ०४ मे २०२४
शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघात त्यांच्यासाठी जाहीर सभा, मेळावे घेतलेले आहेत. तर अजित पवार यांनी देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी जोर लावला आहे. त्यामुळे शिरूरचे वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यासभेत त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर धारदार टीका केली. “ज्यांना आपण केलेली साधी पाच कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई’ आता आपल्याला थांबवायची आहे” असे दरेकर म्हणाले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघातील उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता राज्य पातळीवरील नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रिंगणात उडी घेतली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढवीत आहेत तर महायुतीतर्फे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिरूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून या मतदारसंघातून उमेदवारी घेतली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या डायलॉगबाजीने शिरूरमध्ये प्रचारात रंगत आणली आहे. त्यांचा एकमेकांची जुनी उणीदुणी काढायचा प्रयत्न प्रत्येक सभेत दिसून येतो. दरेकर अमोल कोल्हेंबाबत म्हणाले, “ते फक्त ‘कोल्हेकुई’ करू शकतात. आज नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे हे केंद्रात आणि राज्यात भरभरून निधी देणारे नेतृत्व आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाचे सरकार असताना विरोधी विचारांच्या नेत्याला खासदार म्हणून निवडून देण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कोल्हे यांचा हा शेवटचा प्रयोग ठरणार आहे. नाटकाच्या शेवटच्या अंकाप्रमाणेच त्यांच्या कारकीर्दीचे आहे. आता पुन्हा त्यांचे नाटक आपल्याकडे चालणार नाही. त्यांनी राजकीय नाटक पाच वर्षे केले आहे. त्यातून आपला विकास थांबण्यापालीकडे काहीही हाती लागले नाही. दरेकर टीका करताना शेवटी म्हणाले की, या सर्व गोष्टींमुळे मुळे त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रात परत पाठवण्याची वेळ आली आहे.