मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२४
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन काही आठवडे झाले असून पोलीस २६ एप्रिलपासून त्याचा शोध घेत आहेत, पण अजूनपर्यंत कोणतेही धागेदोरे त्यांना सापडलेले नाहीत. या प्रकरणात दिल्ली पोलीसांचे तपासचक्र वेगाने फिरत आहे आणि याच संदर्भात ते आता मुंबईला पोहोचले आहेत. मुंबईतील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटला दिल्ली पोलिसांनी भेट दिली आहे. मिळालेल्या महितीनुसार, गुरुचरणच्या संपर्कात असलेल्या सहकलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. ‘रोशनसिंग सोढी’ हे लोकप्रिय पात्र गुरुचरण सिंग ‘तारक मेहता…’ मध्ये साकारत असे.
पोलीसांकडून गुरुचरण सिंगचा शोध सुरू आहे. त्यासाठी ते त्याच्या संपर्कातील लोकांची चौकशी करत आहेत. “दिल्ली पोलिसांनी या आठवड्यात आमच्या सेटला भेट दिली आणि गुरुचरण सिंगच्या संपर्कात असलेल्या कलाकारांची त्यांनी चौकशी केली. पोलिसांना सर्वांनी चांगले सहकार्य केले आहे. तसेच प्रॉडक्शन हाऊसकडून गुरुचरण सिंगच्या मानधनाच्या थकबाकी संबंधित काही अफवा होत्या. परंतु, आधीच त्याचे सर्व पैसे देण्यात आले होते, असंही पोलिसांना सेटवर समजलं”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यांसंदर्भात, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे प्रॉडक्शन हेड सोहेल रमाणी यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी तपासाचा एक भाग म्हणून आमच्या सेटला भेट दिली होती. कोणतीही थकबाकी गुरुचरण सिंगची आमच्याकडे नाही, याबाबत आम्ही माहिती दिल्यावर ते परत गेले. आम्ही प्रार्थना करतोय की गुरुचरण सिंग सुखरुप असो, तसेच तो लवकर सापडेल, अशी आम्हाला आशा आहे!”
गुरुचरण सिंग २२ एप्रिलला दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी घरातून निघाला पण तो विमानतळावर गेला नाही आणि माघारी घरीही परतला नाही. त्यानंतर २६ एप्रिल रोजी त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो ई-रिक्षाने काही ठिकाणी जाताना दिसल्याचे आढळले. त्याचा फोनही त्याने दिल्लीतील पालम भागात सोडून दिला होता. त्याच्या बँक खात्याची तपासणी केली असता तो १० हून जास्त खाती वापरत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याशिवाय समजलेली माहिती म्हणजे, तो २७ ईमेल आयडी व दोन फोन वापरत होता, त्याने त्याच्या अकाउंटमधून १४ हजार रुपये काढले होते आणि त्यानंतर त्याच्या अकाऊंटमधून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत.