नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १५ मे २०२४ :
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने देशभरात ४०० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. विरोधक या संकल्पावरून भाजपावर टीका करत आहेत. विरोधकांचं असं मत आहे की, भाजपाला संविधान बदलण्यासाठी आणि देशातील आरक्षण संपवण्यासाठी ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी विरोधकांच्या या आरोपांवर उत्तर दिलं आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सरमा म्हणाले, भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० जागांचा टप्पा ओलांडल्यास मथुरेत कृष्णाचं भव्य मंदिर उभारलं जाईल आणि काशीमधील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथांचं मंदिर बांधलं जाईल.
मुघलांनी आपल्या देशाचं जे जे नुकसान केलंय ते आम्ही दुरुस्त करू असं हिमंता बिस्व सरमा म्हणाले. अद्याप बरीच साफसफाई देशात बाकी आहे. भाजपाने दिलेलं राम मंदिर उभारण्याचं वचन पूर्ण केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा त्यामुळेच मोठा विजय व्हायला हवा.
काँग्रेसवरही हल्लाबोल सरमा यांनी यावेळी केला. ते म्हणाले, “काँग्रेसच्या शासन काळात आपल्याला सांगितलं जायचं की काश्मीर भारतातही आहे आणि पाकिस्तानातही. संसदेत काश्मीर प्रश्नावर कधीच चर्चा होत नव्हती. संसदेत असं कधी म्हटलं जात नव्हतं की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे . मात्र अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. भारताचा झेंडा आता पाकव्याप्त काश्मीरमधील लोकही फडकावू लागले आहेत. तिथली सध्याची परिस्थिती आणि पंतप्रधान मोदींची काश्मीरबाबतची भूमिका पाहाता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ४०० जागा जिंकलो तर पाकव्याप्त काश्मीरदेखील भारताचा भाग बनेल.”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही यावेळी सरमा यांनी टीका केली. सरमा म्हणाले, “घराणेशाहीचे आरोप केजरीवाल पूर्वी काँग्रेसवर करायचे. मात्र आता पत्नीला राजकारणात तेच केजरीवाल त्यांच्या पुढे आणत आहेत. एका आलिशान बंगल्यात ते राहातात. तसेच ते जे काही बोलतात नेमकं त्याच्या उलट वागतात. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ते बरे होईपर्यंत त्यांची परत तुरुंगात जाण्याची वेळ येईल. अंतरिम जामीनावर तुरुंगातून बाहेर अलेल्या दिल्लीच्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यावर दिल्लीतील जनता आता विश्वास ठेवणार नाही. कोणत्याही प्रकारचं धोरण भाजपाविरोधात केजरीवाल यांच्याकडे नाही. त्याला समोर कोणतंही आव्हान दिसत नाही ज्याला राष्ट्राचा विकास करायचा असतो . तो त्याचं काम चोख करत असतो. केवळ नरेंद्र मोदी हेच देशाचा विकास करू शकतात असं आज आपल्या देशातील जनतेलाही वाटतं.”