मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ मे २०२४
मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून काही दिवसांपूर्वी अभिनेता चिन्मय मांडलेकरला ट्रोल करण्यात आलं होतं. चिन्मयने या ट्रोलिंगमुळे मोठा निर्णय घेतला. यापुढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं त्याने जाहीर करून टाकलं. याप्रमाणे अभिनेत्री क्षिती जोगला देखील ट्रोल करण्यात आलं होतं. क्षितीला मंगळसूत्रावरील विधानावरून ट्रोल केलं होतं. याबरोबरच इतर कलाकारांना देखील सध्या ट्रोल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. या सगळ्या प्रकारावरच अभिनेता पुष्कर श्रोत्री भडकला आणि म्हणाला, “आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.”
‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलने संवाद साधताना पुष्कर श्रोत्रीला विचारलं की, ट्रोलिंगमुळे अस्वस्थ व्हायला होतं का? यावर तो म्हणाला, “मी कायम खूप अस्वस्थ होतो. क्षिती जोगला, आमच्या मैत्रीणीला देखील खूप त्रास झाला होता. म्हणजे ट्रोलिंग करण्याची पद्धत आणि ती भाषा ही तुम्हाला अस्वस्थ करणारी आहे. आपल्याला खरंच असं कधी कधी वाटतं हे खरे प्रेक्षक आहेत का? पण माझं मत असं की, क्षिती जोग किंवा चिन्मयला ट्रोल करणारी जी माणसं होती, त्यांची भाषा बघता ती सगळी फेक अकाउंट होती. त्यामुळे ज्यांना चेहराच नाही त्यांना आपण उत्तर का द्यायचं? जर ते खरे असतील आणि त्यांना खरा चेहरा लोकांसमोर आणायचा असेल तर त्यांनी चिन्मयला भेटायला यावं, क्षितीला भेटायला यावं आणि नाराजी व्यक्त करावी. तुम्ही असे छुप्या पद्धतीने, खोटे अकाउंट्स ओपन करून खोटे चेहेरे लावून तुम्ही वाटेल ते बोलाल तर आम्ही ऐकून घेणार नाही. आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही. आमच्या दृष्टीने तुम्ही नगण्य आहात. तुम्ही कोणीच नाहीत. कारण तुमचं अस्तित्वच नाहीये. सोशल मीडियावरची ट्रोलर्सची जी अकाउंट्स आहेत ती सगळी खोटी आहेत. नावं खोटी आहेत, फोटो खोटे आहेत. तुम्हाला जर तुमचं खरं अस्तित्व दाखवण्याची हिंमत नाही तर चिन्मय किंवा क्षितीला त्यांनी हे करावं, ते करावं सांगण्याची गरजही नाही.”
पुढे पुष्कर म्हणाला, “चिन्मयने आधीच सांगितलं होतं, त्याने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं होतं. उद्या तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पण जाणार नाही का, तिचं नाव जहांगीर आहे म्हणून? असं नाही होत. जर तुमच्यात एवढी हिंमत आहे तर तुम्ही सैफ अली खानला म्हणता का तू तैमूर नाव कसं ठेवलंस? आम्ही तुझा एकही चित्रपट बघणार नाही, असं म्हणता का? तर नाही म्हणत. हिंमत का नाही दाखवत?”
“चिन्मय त्या ट्रोलिंग किती त्रस्त झाला असेल. केवढ्या मोठ्या ट्रोमामधून त्याला जावं लागलं असेल. चिन्मयचा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही हा निर्णय म्हणजे त्याचा उद्वेग आहे. चिन्मय उत्तम अभिनेता आहे. तो एक सजग कलाकार आहे. आजूबाजूच्या परिस्थितीवर वेळोवेळी भाष्य करणारा, आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीनुरूप तो आपल्या मुलांच्या संस्कारांमध्ये बदल करणारा आहे. तो त्याच्या मुलांना संस्कार देत असताना तू जहांगीर आहेस तर अमूक कर आणि जहांगीर नसशील तर तमूक कर असं संगत नाहीये ना. तो त्याला याच देशातले भारतीय संस्कृतीतले संस्कार देतोय ना. त्या मुलाचं संगोपनही तो तसंच करतोय. तो इतका सजग कलावंत आहे. या गोष्टीमुळे खजील झाला आहे, निराश झाला आहे, त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं आहे. मला खरंच मनापासून वाटतं की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. खोटी अकाउंटस्, खोटे चेहेरे, कोणी यावं काहीही बोलावं, लपून दगड मारणारे असतात त्यांना काही महत्त्व नाही. जर तुला लढायची हिंमत असेल ना समोर ये, तुझा खरा चेहरा लोकांनाही कळू दे, म्हणणं लोकांना कळतंय ना तुझं, मग चेहराही लोकांना कळू दे!” असं स्पष्टपणे पुष्कर श्रोत्री म्हणाला.
पुढे पुष्कर म्हणाला, “थोड्याफार फरकाने सगळ्यांच्या बाबतीत हे घडतंय. वाईट काय वाटतंय माहितीये? नावाबद्दल जेव्हा तुम्ही ट्रोलिंग करताय तेव्हा तुम्ही त्याला अनुसरून ट्रोलिंग करत नाही आहात. इतिहासाला धरून ट्रोलिंग करत नाही आहात. त्याच्या बायकोच्या, मुलाच्या चारित्र्याबद्दल बोललं जातंय, हे अत्यंत घाणेरडं आहे. ही आपली भारतीय संस्कृती निश्चित नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही बोलताय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यावरती हे संस्कार केले नाहीत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचे आपण अंश आहोत, असं आपण मानतो. एखाद्या परस्त्रीला, एखाद्या पुरुषाला त्याच्या चारित्र्याबद्दल इतक्या हीन दर्जाच्या किळसवाण्या कमेंट्स करू नयेत. तुम्हीच स्वतःला बघा आरशात आणि विचारा आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत का?”