दिल्ली प्रतिनिधी :
दि. २९ जुलै २०२४
एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पावसाचं पाणी अचानक शिरल्यानं दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तानिया सोनी, श्रेया यादव (दोघींचे वय वर्षे २५) आणि नवीन डेल्विन (२८ वर्षे) अशी तिघांची नावं आहेत. तानिया तेलंगणाची, श्रेया उत्तर प्रदेशची, तर नवीन केरळचा रहिवासी होता. तिघेही दिल्लीत लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी आले होते. अनेक विद्यार्थी नेहमीप्रमाणे शनिवारी कोचिंग सेंटरच्या ग्रंथालयात अभ्यास करत होते. त्याच दरम्यान पावसाचं पाणी अचानक कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये शिरलं. या पाण्यात बुडाल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
राव आयएएस स्टडी सर्कलचे मालक आणि दिल्ली महापालिकेचा बेजबाबदारपणा तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे समोर आला आहे. वास्तविक बेसमेंटमध्ये स्टोअर रुम असल्याचं जरी सांगण्यात आलं होतं तरी प्रत्यक्षात तिथे ग्रंथालय तयार करण्यात आलं होतं. तिथे कायम विद्यार्थ्यांची ये-जा त्यामुळे असायची. पोलीस दलातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेसमेंटचं दार बंद करण्यात आलेलं होतं. पण ही दुर्घटना आत शिरलेल्या पाण्याचा जोर जास्त असल्यानं घडली. पण आता या प्रकरणात एक व्हिडीओ समोर आल्याने नवी माहिती समोर आली आहे.
कोचिंग सेंटरच्या समोरुन घेण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं दिसत असून त्याच दरम्यान एक एसयूव्ही त्या पाण्यातून जाते. रस्त्यावर बरंच पाणी साचलं असेल तर बहुतेकवेळा चालक कारचा वेग कमी करतात. पण या एसयूव्हीच्या चालकानं मात्र कार वेगात नेली. साचलेलं पाणी कापत कार वेगात पुढे गेल्याने एक मोठी लाट तयार झाली. ही लाट कोचिंग क्लासच्या दारावर धडकली. त्यामुळे व्हिडीओ चित्रित करत असलेले आसपासचे विद्यार्थी जोरात ओरडले.
कोचिंग क्लासचं दार एसयूव्ही रस्त्यावरुन जाण्याआधी बंद होतं. पण कार वेगात गेल्यामुळे तयार झालेली मोठी लाट वेगात दारावर धडकली. त्यामुळे दार सरकल्याने पाणी वेगानं क्लासच्या बेसमेंटमध्ये शिरलं. कोचिंग सेंटरच्या तळघरात अवघ्या २ मिनिटांत शेकडो लीटर पाणी शिरलं. तब्बल १२ फूट पाणी बेसमेंटमध्ये जमलं. त्यात अडकल्यानं तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेसाठी कोचिंग सेंटरचा मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंह यांना अटक करण्यात आली आहे.