नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०९ ऑगस्ट २०२४
”देशात जेव्हा कोणी मोदी शाह यांच्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नव्हते तेव्हा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांचा चेहरा बनले. शेख हसीना यांच्यासारखं, महाराष्ट्रातील खोके सरकारला पळवून-पळवून मारायचं नाहीये, तर लोकशाही मार्गानं घालवायचं आहे. भाजपचा साहित्य, कला क्रीडा याच्याशी संबंध आला असता तर, विनेश फोगाटचं पदक गेलं नसतं. विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत आहे. तिचं पदक गेल्याने भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत, असा आरोप राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.
आज महायुती सरकारवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान ठरलेल्या रणनीतीचीसर्व माहिती राऊत यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रातून खोके सरकारला घालवायचंय. तसंच दिल्लीतील बैठकीत नेमकं काय ठरलं, यासंदर्भातही त्यांनी सांगितले.
मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह इतर नेत्यांची उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. १६ ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा आहे. राज्याचा दौरा, उद्धव ठाकरे , शरद पवार करणार आहेत. शिवाय संजय राऊत यांनी, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात यावं, अशी चर्चा झाल्याची माहिती दिली. दरम्यान, ”फार ओढाताण न करता सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, असं तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलंय” असेही ते म्हणाले. राज्यातून खोके सरकार कोणत्याही परिस्थितीत घालवायचं आहे, भाजपला राज्यातून हद्दपार करायचं आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
”देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शाह महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरु आहे त्याचे सूत्रधार आहेत”, असा आरोप देखील राऊत यांनी यावेळी केला आहे. राऊत यांनी यावेळी राहुल गांधी यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं. राहुल गांधी हा जर लोकसभा निवडणुकीत चेहरा झाला असता तर भाजपचा अनेक जागांवर पराभव करता आला असता, असं राऊत यावेळी म्हणाले.