डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १३ ऑगस्ट २०२४
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात केली. सध्या राज्यभरात या योजनेची जोरदार चर्चा होत आहे. महायुती सरकारला विरोधकांनी या योजनेवरून चांगलेच धारेवर धरले आहे. त्यातच आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी, जे महायुतीत आहेत, त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जर तुम्ही यंदाच्या निवडणुकीत आम्हाला आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन, असे वक्तव्य त्यांनी केले. रवी राणांवर यावरून टीकेची झोड उठत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना आता चांगलीच समज दिली आहे.
रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, रवी राणा यांचे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. सरकारने आणलेली योजना आहे. विनोदात म्हटले असले तरी ते चुकीचेच आहे. विनोदातही लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेण्याचे वक्तव्य करु नका, अशी समज त्यांनी रवी राणा यांना दिली आहे.
काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनीही रवी राणांवर चांगलाच पलटवार केलेला आहे. शासकीय योजना ज्या असतात त्या योजना शासनाला राबवायच्या असतात. शासकीय योजना ही सरकारची असून कोणाच्या बापजाद्याची योजना नसते. पैसे जनतेच्या टॅक्समधून जमा झालेले असतात. अशा योजनेतील पैसे हे त्यामुळे कोणी काढून घेऊ शकत नाही, असा टोला आमदार रवी राणा यांना खासदार बळवंत वानखडे यांनी लगावला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात, अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतील निधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांचा प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवला आहे. लाडकी बहीण योजनेला जरी आमचा विरोध नसला तरी तुम्ही महिलांना धमकीवजा इशारा देत असाल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही. आपल्या लाडक्या बहिणीला जो भाऊ धमकी देतो तो भाऊ, लाडका नसून बहिणीची ओवाळणी खाणारा भाऊ आहे, असा संताप यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.